- सामूहिक भूखंडाच्या मालकीबाबत धोरण
पिंपरी – प्राधिकरण क्षेत्रातील विविध वापरासाठीच्या भूखंड वाटपात एकापेक्षा आधिक व्यक्तींची मालकी असलेल्या भूखंडबाबत ठरविण्यात आलेल्या धोरणाला प्राधिकरणाच्या सभेत मान्यता देण्यात आली. एकापेक्षा अधिक व्यक्ती मालक असल्यास स्वत:ची जागा इतरांना लीझ डीड करून देताना इतर व्यक्तीच्या संम्मतीपत्राची आवश्यकता राहणार नाही. या निर्णयाचा फायदा एकापेक्षा अधिक व्यक्ती मालक असलेल्या भूखंड धारकांना होणार आहे.
प्राधिकरणाने वितरित केलेले निवासी भूखंड एकापेक्षा आधिक व्यक्तींना “लीझ डीड’ तत्त्वावर देण्यात आलेले आहेत. त्यामुळे एका भूखंडात दोन-दोन मालक असल्याने मालकी हक्काचे वाद उद्भवत आहे. एकापेक्षा आधिक व्यक्तींची मालकी असलेल्या भूखंडात संबंधितांनी त्यांच्या-त्यांच्या जागेत बांधकामे करून घरे बांधली आहेत. संबंधित भूखंड अन्य व्यक्तीला “लीझ डीड’ करून देताना दोन्ही मालकाची संमती लागते.
काही वेळा दुसरा मालक त्यासाठी जाणीवपूर्वक संमती देत नाही. त्यामुळे एका मालकाला त्याच्या ताब्यातील अर्धा भूखंड अन्य व्यक्तीला “लीझ डीड’ करून देण्यासाठी अडचणी जाणवतात. त्यावर तोडगा म्हणून प्राधिकरणाने त्याबाबत धोरण ठरविले आहे. या धोरणानुसार एक भूखंड दोन व्यक्तींना दिलेला असल्यास आता दुसऱ्या सहधारकाचे संमतीपत्र लागणार नाही. त्याऐवजी, नियोजन विभागाचा अभिप्राय घेतला जाईल. तसेच, एका भूखंडाच्या दोन्ही मालकांना समोर बोलावुन निर्णय घेतला जाणार आहे.