पिंपरी -क्रिकेट खेळण्यावरून झालेल्या भांडणात एका टोळक्याने रस्त्यावर पार्क केलेल्या पाच वाहनांची तोडफोड केली. बुधवारी (दि. 27) मध्यरात्री एकच्या सुमारास पिंपळे गुरव येथे ही घटना घडली. गुंडा विरोधी पथकाने दोन जणांना अटक केली आहे.
किरण प्रभाकर गायकवाड (वय 21, रा. सृष्टीचौक, पिंपळे गुरव) आणि भूषण उत्तम सुरवसे (वय 22, प्रभातनगर, पिंपळे गुरव) या दोघांना गुंडा विरोधी पथकाने अटक केली आहे. तसेच त्यांचा अल्पवयीन साथीदार (वय 16) याला पोलिसांनी ताब्यात घतले आहे. सूर्यभान दगडू चोथवे (वय 40, रा. सृष्टी चौक, पिंपळे गुरव, सांगवी) यांनी बुधवारी (दि. 27) याबाबत सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील टोणपे यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींचे क्रिकेट खेळण्याच्या कारणावरून मंगळवारी सायंकाळी भांडण झाले होते. ज्या तरुणांशी भांडण झाले होते त्यांना मारण्यासाठी आरोपी आले होते.
मात्र ते मिळून न आल्याने त्या भांडण करणाऱ्या तरुणांच्या गाड्या आहेत, असे समजून आरोपींनी वाहनांची तोडफोड केली. दरम्यान गुंडा विरोधी पथकाने याबाबत तपास केला असता एका आरोपीबाबत पोलिसांना माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असता त्याने आणखी दोन जणांची नावे सांगितली. त्यामध्ये एका अल्पवयीन मुलाचाही समावेश होता. गुंडा विरोधी पथकाने आरोपींना ताब्यात घेऊन सांगवी पोलिसांच्या स्वाधीन केले. आरोपी कोयता घेऊन वाहनांची तोडफोड करीत असताना आरोपीच्या हाताला कोयत्याने दुखापत झाली. त्याला टाकेही पडले असल्याचे दिसून आले.