- काहींचे लपून-छपून वास्तव्य
- अनेक गुन्हेगाराचे चोरी छुपे शहरात येणे-जाणे सुरूच
पिंपरी – सराईत गुन्हेगारांचे शहरातील वास्तव्य समाजासाठी धोकादायक असल्याने पोलीस त्यांना तडीपार करतात. गेल्या दीड वर्षात 110 जणांना शहरातून तडीपार करण्यात आले आहे. मात्र तडीपार गुन्हेगाराचे शहरात वास्तव्य आणि ये-जाणे सुरूच असल्याचे, तसेच काहीजण लपून-छपून शहरातच वास्तव्य करत असल्याचे वेळोवेळी उघड झाले आहे.
गुन्हेगारावर कायद्याचा वचक राहावा, यासाठी सराईत गुन्हेगारांना तडीपार केले जाते.
साधारणतः 25-30 वर्षांपूर्वी तडीपार या शब्दाची दहशत होती. एखाद्यावर तडीपारीची कारवाई करणार, हे ऐकल्यावरही त्या कुटूंबात अस्वस्था निर्माण होत असे. कारण त्यावेळी एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाणे त्यावेळी सहज सोपे नव्हते. आता मात्र अवघ्या काही तासांत दोन-तीन जिल्हे पार करून जाता येते. यामुळे अनेक तडीपार गुंड रात्री-अपरात्री शहरात येतात आणि नंतर पुन्हा पळून जातात.
पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय कार्यान्वित झाल्यापासून गेल्या दीड वर्षात तब्बल 110 गुन्हेगारांना तडीपार करीत शहराबाहेरचा रस्ता दाखविला. तसेच अनेकांवर मोक्का (महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी विरोधी कायदा) आणि एमपीडीए (झोपडपट्टी दादा विरोधी कायदा) याद्वारे कारवाई केली. या कलमांखाली तब्बल 100 हून अधिक गुन्हेगारांवर करीत त्यांना तुरूंगात पाठविले.
कायद्यात सुधारणा नाही
कालांतराने गरजेनुसार जुन्या कायद्यांमध्ये बदल झाला नाही. याचा थेट फायदा गुन्हेगारांना होताना दिसतो. अनेक गुन्हेगार कोणतीही परवानगी न घेता शहरात येतात. आपली दहशत निर्माण करतात. यापैकी बहुतांश गुन्हेगार पोलिसांच्या हातावर तुरी देऊन फरार होतात. जर पोलिसांच्या हाती लागले तरी त्यांच्यावर गुन्हा दाखल करून न्यायालयात हजर केले जाते. मात्र जवळचे नातेवाईक आजारी असल्याचे कारण देऊन ते न्यायालयाची सहानुभूती मिळवितात आणि सुटका करून घेतात. शहरातील काही गुन्हेगारांवर तडीपारीच्या आदेशाचा भंग केला म्हणून सात ते आठ गुन्हे दाखल आहेत. पोलीस आपल्याला काही करू शकत नाही हे गुन्हेगारांना माहिती असल्याने कायद्याचा धाक त्यांच्यामध्ये राहिलेला नाही.
प्रतिबंधात्क कारवाई ही परिणामकारक आहे. यामुळे सराईत गुन्हेगारांच्या कारवायांवर मर्यादा येतात. जरी गुन्हेगार आपल्या हद्दीत आला तरी रात्रगस्तीचे अधिकारी याबाबत वेळोवेळी तपासणी करतात. याशिवाय खबरी व्यक्तीची माहिती किंवा कोंम्बिग ऑपरेशनमध्ये तो सापडतोच. तडीपारीच्या आदेशाचा भंग करणाऱ्या अशा गुन्हेगारांवर कडक कारवाई केली जाते.
स्मिता पाटील, पोलीस उपायुक्त