अंदाजपत्रकावरील पालिकेच्या खास सभेत झाला प्रकार
पुणे -“सत्ताधाऱ्यांनी लाजलज्जा सोडली आहे’ असे वाक्य सोमवारी महापालिका मुख्यसभेत राष्ट्रवादीचे स्वीकृत नगसेवक सुभाष जगताप यांनी उच्चारताच माजी सभागृहनेते श्रीनाथ भिमाले चिडले. त्यामुळे सभागृहातील वातावरण काही काळ तापले.
“लाजलज्जा’ या शब्दावर भिमाले यांनी आक्षेप घेतला. “अशाप्रकारचे असंसदीय शब्द जगताप वापरत आहेत, त्यांनी माफी मागावी अन्यथा त्यांना भाषण करू देणार नाही,’ असा पवित्रा भिमाले यांनी घेतला. त्याचवेळी “त्यांना असे अपशब्द वापरले, तर चालतील का,’ असा सवाल सभागृहनेते धीरज घाटे यांनी विचारला.
यात महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सर्व सदस्यांना खाली बसण्याची विनंती केली.
मात्र, “हा शब्द माझा नसून, माध्यमांनी वापरला आहे, त्यामुळे मी माफी मागायचा प्रश्न येत नाही,’ असे जगताप म्हणाले. त्यावरून पुन्हा शाब्दिक युद्ध सुरू झाले. त्यात भिमाले यांनी जगताप यांचा एकेरी उल्लेख केला. “अंदाजपत्रकावर बोला, योग्य पद्धतीने शब्दप्रयोग करा,’ अशा सूचना महापौरांनी दिल्या. त्यानंतर हे प्रकरण निवळले.
जगताप यांचा भिमाले यांना टोला
अंदाजपत्रकावरील भाषण संपताना जगताप यांनी पुन्हा एकदा भिमाले यांना टोला हाणला. ते म्हणाले की, “भिमाले यांच्या प्रभागामध्ये 14 लाख रुपयांचे झाड आहे. ते झाड पैसे देते. रोज हलवले की हे झाड रोज दहा हजार रुपये देते. असे झाड प्रत्येक प्रभागात द्यावे.’ मात्र, या वेळी भिमाले सभागृहात नव्हते.