मुंबई – अभिनेत्री आणि शिवसेनेच्या नेत्या दीपाली सय्यद या आपल्या सोशल मीडियावरील वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असतात . मात्र, आता पुन्हा एकदा दीपाली सय्यद प्रकाश झोतात आल्याचं दिसून येत आहे. पण आता कोणत्याही विधानामुळे नाही तर, एका वेगळ्याच कारणामुळे त्या चर्चेत आल्या आहेत.
‘अभिनेत्री दीपाली सय्यद यांचे पाकिस्तान आणि दुबईसोबत संबंध असून, त्यांनी पाकिस्तानचे नागरिकत्व स्वीकारले’ असल्याचं खळबळजनक आरोप माजी स्वीय सहाय्यक भाऊसाहेब शिंदे यांनी केला होता. एक पत्रकार परिषदेत शिंदे बोलत होते. तसेच दीपाली सय्यद यांनी ट्रस्टच्या नावाखाली अनेकांना गंडा घातल्याचाही आरोप त्यांनी केला होता. याप्रकरणी आता दिपाली सय्यद यांनी पोलिसांत धाव घेत भाऊसाहेब शिंदे यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे.
भाऊसाहेब शिंदे नेमकं काय म्हणाले होते?
“अभिनेत्री दिपाली सय्यद यांचे पाकिस्तानशी संबंध असून पाकिस्तानचे नागरिकत्व स्वीकारले आहे. तसेच त्यांचे पाकिस्तानामध्ये एक बँक खाते देखील आहे. यासाठी दाऊद इब्राहिम याची पत्नी मेहजबिन कासकर हिने मदत केली असून, सोफिया सय्यद या नावाने पाकिस्तानी नागरिकत्व दिले असल्याचा पुरावा भाऊसाहेब शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिला होता.
शिंदे यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी दिपाली सय्यद यांनी शिंदे यांच्याविरोधात तक्रार दाखल केल्यानंतर यातून आता काय समोर येणार हे स्पष्ट होण्याची शक्यता आहे.