नगर -पायी हळूहळू चाला, मुखाने उदो उदो बोला… जय जगदंब…चा नाम गजर, विविध अभंगांच्या ठेक्यावर ताल धरून नाचणारे भक्तगण, अग्रभागी मानाचे अश्व, ध्वज, फुगड्या खेळणाऱ्या महिला, ठिकठिकाणी रांगोळी काढून व सडे शिंपडून रहिवाशांनी पालखीचे केलेले स्वागत अशा उत्साही वातावरणात दरवर्षीप्रमाणे चैत्र पौर्णिमेला होणारा योगेश्वरी देवीचा तीन दिवसीय उत्सव केडगावच्या वैष्णव नगरमध्ये मोठ्या उत्साहात पार पडला.
या वेळी पाचशे मीटरपर्यंत कोऱ्या वस्त्रांच्या पायघड्या टाकण्यात आल्या होत्या. वैष्णवनगरमधील विश्वमाता गायत्री परिवार व जगदंबा सेवा मंडळ यांच्यातर्फे चैत्र पौर्णिमेनिमित्त योगेश्वरी देवीच्या प्रतिवार्षिक उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी विविध ठिकाणांहून भाविक उपस्थित होते. हे उत्सवाचे 38वे वर्ष होते. गायत्री शक्ती पीठ शांतिकुंज, हरिद्वार यांच्या प्रेरणेने शनिवारी सकाळी नवकुंडी गायत्री यज्ञ करण्यात आला, अशी माहिती चंद्रकांत ऊर्फ तात्या देशमुख यांनी दिली.
सायंकाळी मारुती मंदिरापासून पादुकांची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. या सोहळ्यात घनपाठी वेदमूर्ती महेश रेखे यांच्या हस्ते पादुकांची स्थापना व पूजन करण्यात आले, तसेच त्यांनी व त्यांच्या सोबतच्या ब्रह्मवृंदांनी या वेळी श्री सूक्त पठण केले. या सोहळ्यास जिल्हा परिषदेचे माजी सदस्य ऍड. सचिन जगताप, सचिन कोतकर उपस्थित होते. मिरवणुकीनंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.
उत्सवाच्या पहिल्या दिवशी बुधवारी कुमारिका, बटू व सुवासिनी पूजन करण्यात आले. सायंकाळी श्री योगेश्वरी भजनी मंडळ व स्वरमंदिर भजनी मंडळ यांचा भजनाचा कार्यक्रम झाला.गुरुवारी पालखी सोहळ्यानंतर रात्रभर देवीचा जागर करण्यात आला. शुक्रवारी पहाटे सोहळ्याची सांगता करण्यात आली. या सोहळ्यासाठी अनेक भाविक भक्तांनी परिश्रम घेतले. पूजेचे अधिपत्य संदीप जोशी यांनी केले.