- वाहनचोरांची शक्कल उघड, 12 मोटारी हस्तगत
- गुन्हे शाखा युनिट एकची कारवाई
- आतंरराज्यीय टोळी अपघातग्रस्त, भंगार वाहनांचा वापर
पिंपरी – विमा कंपनीकडून अपघातग्रस्त व भंगारातील मोटार कवडीमोल भावात विकत घ्यायच्या, त्याच मॉडेलच्या मोटारी दुसऱ्या राज्यातून चोरून आणायच्या. चोरून आणलेल्या मोटारीला भंगारमधील मोटारीचा चेसी नंबर टाकून ती आरटीओ पासिंग करून विकून टाकायची, अशी शक्कल लढवून अनेक वाहने चोरुन नंतर विकणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झाला आहे. या आंतरराज्यीय टोळीच्या एका सदस्याला पिंपरी चिंचवड गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने अटक केली. त्याच्याकडून 12 मोटार, 15 मोटारीचे इंजिन असा 2 कोटी 19 लाख रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.
चनप्रीत हरविंदपाल सिंह (वय 43, रा. रावेत, पुणे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई यांनी दिलेल्या माहितीनुसार, भक्ती-शक्ती चौक ते मुकाई चौक या रोडवरील गॅरेजमध्ये मोठ्या प्रमाणात मोटरीचे इंजिन आणि सुटे पार्ट आहेत. तसेच गॅरेजच्या बाहेर दोन चोरीच्या मोटार असल्याची माहिती गुन्हे शाखा युनिट एकचे सहाय्यक निरीक्षक गणेश पाटील आणि पोलीस शिपाई सचिन मोरे यांना मिळाली. त्यानुसार, पोलिसांनी गॅरेजचा मालक चनप्रीत याला ताब्यात घेतले. गॅरेज समोर पार्क केलेल्या मोटारीवर महाराष्ट्राचा पासिंग नंबर होता. तर इंजिन नंबर पंजाबमधील असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी चनप्रीत याला अटक करून न्यायालयात हजर केले असता त्यास 13 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली.
पोलीस तपासात आरोपी चनप्रीत याने सांगितले की विमा कंपनीकडून अपघात झालेल्या मोटार कागदपत्रांसह विकत घेत. विकत घेतलेल्या कारच्या मॉडेल आणि रंगाची मोटार पंजाब, हरियाणा, दिल्ली आणि इतर राज्यातून चोरून आणत. चोरून आणलेल्या गाड्यांवर अपघात झालेल्या खरेदी केलेल्या केलेल्या गाड्यांचे चेसिस नंबर लावून ते मोठ्या रकमेला विकत. या मोटारी 10 ते 18 लाख रुपयांपर्यंत विक्री करीत असे. आरोपीने विक्री केलेल्या 12 महागड्या मोटार पोलिसांनी जप्त केल्या. आरोपीचे कोंढव्यातही गॅरेज आहे. कोंढवा आणि रावेत येथील गॅरेजमधून इन्शुरन्स कंपनीकडून घेतलेल्या गाड्यांचे 13 आणि पंजाब, दिल्ली येथून चोरीला गेलेल्या गाड्यांचे दोन असे एकूण 15 इंजिन असा एकूण 2 कोटी 19 लाख रुपयांचा मुद्देमाल गुन्हे शाखेच्या युनिट एकने जप्त केला आहे.
आरोपींनी विकलेल्या मोटारी पोलिसांनी पुणे, पिंपरी-चिंचवड, नवी मुंबई, नागपूर, सातारा, अहमदनगर, आळेफाटा आणि गोवा येथून जप्त केल्या आहेत. जप्त केलेल्या सहा मोटारींचे गुन्हे पंजाब, हरियाणा, दिल्ली येथील पोलीस ठाण्यात दाखल आहेत.
चोरलेली कार आणण्यासाठी विमान प्रवास
परराज्यातील साथीदारांनी चोरलेली मोटार आणण्यासाठी आरोपी पुण्यातून पंजाब, हरियाणा आणि दिल्ली येथे चक्क विमानाने जात होता. जाताना विमानाने जायचे आणि येताना चोरी केलेली कार चालवत घेऊन यायचे.