भेटून गेलेल्या व्यक्तीला करोनाची बाधा
इस्लामाबाद: करोना संकटाने ग्रासलेल्या पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या टेन्शनमध्ये भर पडली आहे. मागील आठवड्यात इम्रान यांची भेट घेणाऱ्या एका व्यक्तीला करोनाची लागण झाल्याचे समोर आले. त्यामुळे आता इम्रान यांचीही करोनाविषयक चाचणी घेतली जाणार आहे.
पाकिस्तानमधील मानवतावादी कार्यकर्ते फैसल इधी यांनी 15 एप्रिलला इम्रान यांची भेट घेतली. त्या भेटीत त्यांनी करोनाविरोधी लढ्यासाठी 1 कोटी रूपयांच्या मदतीचा धनादेश इम्रान यांच्याकडे सुपूर्द केला. त्या भेटीनंतर फैसल यांना करोनाचा संसर्ग झाल्याचे आढळले. त्या घडामोडीनंतर इम्रान यांना तपासणी करून घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला.
तो सल्ला मानत इम्रान स्वत:ची चाचणी करून घेणार आहेत. दरम्यान, पाकिस्तानात करोनाचा वेगाने फैलाव होत आहे. त्या विषाणूचा संसर्ग झालेल्यांची पाकिस्तानमधील संख्या 10 हजारांच्या जवळ पोहचली आहे. त्या देशात करोनाने आतापर्यंत सुमारे 200 जणांचा बळी घेतला आहे. पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात मंगळवारी आणखी 25 डॉक्टर आणि परिचारिकांना करोनाची बाधा झाली. त्यामुळे त्या देशातील करोनाबाधित डॉक्टर आणि इतर वैद्यकीय कर्मचाऱ्यांची संख्या 140 इतकी झाली आहे.