मुंबई – करोनामुळे सध्या अनेक खेळाडू घरातच असल्याने वेळ घालवायला सोशल मीडियावर व्यस्त आहेत. भारताचा कसोटी क्रिकेटपटू मुरली विजय देखील इन्स्टाग्रामवर सक्रिय आहे. त्यात त्याने लाइव्ह चॅटमध्ये भारताचा सलामीवीर फलंदाज शिखर धवन व ऑस्ट्रेलियाची महिला क्रिकेटपटू एलिस पेरी यांच्यासह डिनर करण्याची इच्छा असल्याचे एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले आहे.
या चर्चेत त्याने अनेकांच्या प्रश्नांवर उत्तरे दिली. करोनाच्या संकटामुळे सध्या घरात असलो तरीही सोशल मीडियावर चाहत्यांशी संवाद साधताना मजा येते. सध्या देशातील परिस्थिती पाहता खूप मोठ्या संकटाचा आपण सगळेच सामना करत आहोत. त्यामुळे लोकांनी सरकारला सहकार्य करा व त्यांच्या सूचनांचे पालन करा तरच हा लढा आपण जिंकू असेही विजयने सांगितले.
या चॅटमध्ये तुला कोणाबरोबर डिनर करायला आवडेल असा प्रश्न विचारला गेला त्यावर त्याने शिखर धवन व ऑस्ट्रेलियाची महिला क्रिकेटपटू एलिस पेरी यांचे. अन्य एका प्रश्नाला उत्तर देताना माजी कसोटीपटू व सलामीवीर आक्रमक फलंदाज वीरेंद्र सेहवाग हा सर्वात आवडता फलंदाज असल्याचे व्यक्त केले. सेहवागसह ड्रेसिंग रूम शेअर करणे माझ्यासाठी खूपच स्पेशल होते, असेही त्याने स्पष्ट केले.