- माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहीम
- 182 आशा, 314 अंगणवाडी सेविकांची नेमणूक
- करोना नियंत्रणात आणण्यासाठी घरोघरी भेटी देणार
पिंपरी – राज्य सरकारच्या संकल्पनेतून राज्यभरात राबविण्यात येणारी “माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ ही मोहीम पिंपरी – चिंचवड शहरातही प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. या मोहिमेसाठी 182 आशा स्वयंसेविका आणि 314 अंगणवाडी सेविकांची नियुक्ती केली आहे. त्यांना प्रति दिन 450 रुपये भत्ता देण्यात येणार आहे. त्यासाठी 55 लाख 80 हजार रुपये खर्च होणार आहे.
करोना प्रादुर्भाव वाढत असल्याने त्यावर नियंत्रण आणण्यासाठी घरोघरी भेटी देऊन आरोग्य शिक्षण, महत्त्वाचे आरोग्य संदेश, संशयित करोना रुग्ण शोधणे तसेच मधुमेह, हृदयविकार, किडनी आजार, लठ्ठपणा यांसारख्या महत्त्वाच्या आजारांच्या व्यक्ती शोधून काढण्यात येणार आहेत. याशिवाय बालकांचे लसीकरण आणि गरोदर मातांवर वेळीच उपचार या बाबींचाही या मोहिमेत अंतर्भाव करण्यात आला आहे. ही मोहीम पहिल्या फेरीत 15 सप्टेंबर ते 10 ऑक्टोबर आणि दुसऱ्या फेरीत 12 ऑक्टोबर ते 24 ऑक्टोबर या कालावधीत राबविण्याच्या राज्य सरकारच्या सूचना आहेत.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने पहिल्या फेरीत ही मोहीम 15 सप्टेंबर ते 10 ऑक्टोबर या कालावधीत तर, दुसऱ्या फेरीत 14 ऑक्टोबर ते 24 ऑक्टोबर या कालावधीत राबविण्यात येत आहे. शहराची लोकसंख्या सुमारे 24 लाख 76 हजार एवढी आहे. पल्स पोलिओ नकाशानुसार अंदाजे 8 लाख 18 हजार 628 घरे आहेत. त्यानुसार, “माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या मोहिमेअंतर्गत पहिल्या फेरीतील 15 दिवसांमध्ये दैनंदिन 54 हजार 575 घरांना भेटी देणे आवश्यक आहे.
दैनंदिन एका पथकाने 35 घरभेटी याप्रमाणे एकूण 1 हजार 559 पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. एका पथकामध्ये एक आरोग्य कर्मचारी, वॉर्डनिहाय एक स्थानिक नागरिक त्यामध्ये एक पुरुष आणि एक महिला अशा तीन व्यक्तींचा समावेश राहणार आहे. यामध्ये आशासेविका आणि अंगणवाडी सेविका यांचा समावेश करण्यात आला आहे. या मोहिमेच्या अंमलबजावणीसाठी 182 आशा स्वयंसेविका आणि 314 अंगणवाडी सेविका सहभागी करून घेण्यात आल्या आहेत. त्यांना प्रति दिन 450 रुपये भत्ता देण्यात येणार आहे. त्यानुसार, पहिल्या आणि दुसऱ्या फेरीसाठी 55 लाख 80 हजार रुपये खर्च होणार आहे