पेशावर – प्रसिद्ध चित्रपट अभिनेते राज कपूर आणि दिलीप कुमार यांचे जन्मस्थान असलेल्या पाकिस्तानमधील घरांची खरेदी करण्याचा निर्णय पाकिस्तानमधील खैबर पख्तुनवा प्रांताच्या सरकारने घेतला आहे.
या ज्येष्ठ अभिनेत्यांच्या वंशपरंपरागत इमारती आता अत्यंत जीर्ण आणि मोडकळीस आलेल्या आहेत. त्या पडून नष्ट होण्याच्या बेतात असतानाच खैबर पख्तुनवा सरकारने त्यांचे संवर्धन करण्यासाठी या इमारती खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे.
पेशावर शहरात मध्यवर्ती भागात असलेल्या या दोन्ही इमारती राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित करण्यात आल्या आहेत. खरेदी करण्यासाठी पुरेसा निधी उपलब्ध करून देण्याचा निर्णय खैबर पख्तुनवा प्रांतातील पुरातत्व विभागाने घेतला आहे. या दोन्ही इमारतींचे मूल्य निश्चित करण्यासाठी एक अधिकृत पत्र पेशावरच्या उपायुक्तांना पाठवून देण्यात आले आहे.
राज कपूर आणि दिलीप कुमार या हिंदी चित्रपटसृष्टीतील ख्यातनाम अभिनेत्यांचा जन्म फाळणीपूर्वी पाकिस्तानमध्ये याच घरांमध्ये झाला होता. तेथेच हे दोघेही लहानाचे मोठे झाले होते, असे पुरातत्व विभागाचे प्रमुख डॉ. अब्दुस समाद खान यांनी सांगितले.
‘कपूर हवेली’हे राज कपूर यांचे वडिलोपार्जित निवासस्थान किस्सा ख्वानी बाजार परिसरात आहे. ही हवेली 1918 साली राज कपूर यांचे आजोबा दीवान बशेस्वरनाथ कपूर यांनी बांधली. राज कपूर आणि त्यांचे काका त्रिलोक कपूर यांचा जन्म याच हवेलीमध्ये झाला. तर दिलीप कुमार यांचे जन्मस्थान असलेली 100 वर्षे जुनी वडिलोपार्जित वास्तूही याच परिसरात आहे. या दोन्ही वास्तूंना राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित करण्यात आले आहे.