निर्माते क्षितीज रवी प्रसाद यांना 3 ऑक्‍टोबरपर्यंत कोठडी

मुंबई – अमली पदार्थांविषयीच्या कथित संबंधांवरून अमली पदार्थ नियंत्रण विभागाकडून अटक करण्यात आलेले बॉलिवूडमधील कार्यकारी निर्माता क्षितीज रवी प्रसाद याला 3 ऑक्‍टोबरपर्यंत ‘एनसीबी’ची कोठडी सुनावण्यात आली आहे. 

प्रसाद यांना आज व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून न्यायालयासमोर उपस्थित केले गेल्यानंतर ही कोठडी सुनावण्यात आली. अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येप्रकरणी तपास करत असलेल्या सक्‍तवसुली संचलनालयाला मिळालेल्या काही ‘व्हॉट्‌स ऍप चॅट’च्या आधारे ‘नार्कोटिक्‍स कंट्रोल ब्युरो’ने तपास करायला सुरुवात केली होती. 

या तपासादरम्यान अनेक धक्कादायक तथ्ये उजेडात आली. ‘एनसीबी’ने बॉलिवूडमधील दीपिका पदुकोण, सारा अली खान आणि श्रद्धा कपूर यांचीही चौकशी केली आहे. या अभिनेत्रींचे मोबाईल फोन फॉरेन्सिक तपासणीसाठी जप्त करण्यात आले आहेत.

क्षितीज रवी प्रसाद याने चौकशी दरम्यान दिलेल्या जबाबत आपण अमली पदार्थ करमजीत सिंग आनंद या अन्य आरोपीकडून खरेदी केल्याचे सांगितले होते. त्याच्या जबाबाच्या आधारे ‘एनसीबी’अधिक तपास करत असून या संदर्भात आणखी काही धागेदोरे मिळाले असून बॉलिवूडमधील आणखी काही जणांचा अमली पदार्थांशी संबंधित व्यवहार करणाऱ्यांबरोबर लागेबांधे असण्याचे संकेत व्यक्त होत आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.