पुणे : महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश जगताप आज सेवा निवृत्त झाले. महापालिका अधिकाऱ्यांमधून बढतीने अतिरिक्त आयुक्त पदी निवड होणारे जगताप हे राज्यातील महापालिकांमधील पहिले अतिरिक्त आयुक्त होते.
पाच महिन्यांपूर्वीच शासनाकडून या पदावर त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. जगताप हे 36 वर्षे महापालिकेच्या सेवेत होते. या कालावधीत शहराची कचरा समस्या सोडविण्यासाठी जगताप यांनी राबविलेले प्रकल्प विशेष चर्चेचे ठरले. त्यात, स्वच्छ संस्थेच्या प्रकल्पाचा समावेश आहे.
जगताप हे 1985 मध्ये महापालिकेतील कनिष्ठ अभियंता पदावर नियुक्त झाले होते. त्यानंतर 1995 मध्ये त्यांना महापालिकेच्या क्षेत्रीय अधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली. तर पुढे उपायुक्त झाले. या कालावधीत त्यांच्या निदर्शनाखाली वारजे-कर्वेनगर, कोंढवा-येवलेवाडी तसेच वानवडी क्षेत्रीय कार्यालयाच्या स्थापनाझाली तसेच त्यांची महापालिकेच्या चार परिमंडळाचे उपायुक्त म्हणूनही जबाबदारी सांभाळली. दरम्यान, 2007 मध्ये महापालिकेने स्वतंत्रपणे घनकचरा व्यवस्थापन विभागाची स्थापना केली.