अँजेलिना जोलीच्या आगामी फॅन्टेसी फिल्म “मेलफिसेंट: मिस्ट्रेस ऑफ एव्हिल’ च्या हिंदी आवृत्तीमध्ये अँजेलिनाला आपण बघणार आहोत. पण आवाज मात्र ऐश्वर्या रायचा ऐकणार आहोत. कारण या सिनेमात अँजेलिनासाठी हिंदी डबिंग ऐश्वर्या करणार आहे.
खरे तर ही बातमी डिज्नी युनिव्हर्सशी संबंधित आहे. “मेलफिसेंट: मिस्ट्रेस ऑफ एव्हिल’ हा चित्रपट 18 ऑक्टोबर रोजी हिंदी आणि इंग्रजी या दोन्ही भाषांमध्ये जगभर रिलीज होणार आहे. या सिनेमाच्या निमित्ताने ऐश्वर्याने डिज्नी युनिव्हर्सच्या प्रोजेक्टबरोबर काम करण्यास सुरुवात केली आहे. अँजेलिनाचा हा सिनेमा 2014 मध्ये आलेल्या “मेलफिस्टंट’चा सिक्वल आहे. अर्थात लीड रोल अँजेलिनाचाच आहे. तिच्याशिवाय ऍली फॅनिंग, सेम रिले, एमेल्डा स्टॉन्टन, जुना टेम्पल, लेस्ले मेनविले हे देखील या फॅन्टॅसी मुव्हीमध्ये असणार आहेत.
या पूर्वी ऐश्वर्याने अन्य कोणत्याही हॉलिवूड मुव्हीसाठी हिंदी डबिंग केलेले नाही. त्यामुळे तिच्यासाठीही हा नवीन अनुभव असणार आहे. त्यातही अँजेलिना जोलीसारख्या हॉट ऍक्ट्रेससाठी डबिंग हा ऐश्वर्याचा बहुमान आहे. नुकतेच ऐश्वर्याने पॅरिस फॅशन वीकमध्ये रॅम्प वॉक करून आपल्या चाहत्यांना घायाळ करून टाकले आहे. तिने 18 वर्षांनंतर या फॅशन शो मध्ये सहभाग घेतला आहे.