हरिनामाच्या गजरापुढे घाटातील डोंगर ठेंगणा

तुकोबांच्या पालखी सोहळ्याने केला अवघड रोटी घाट लीलया सर

– नीलेश जांबले

वासुंदे –
मार्गी बहुत ।
याचि गेले साधुसंत ।।
नका जाऊ आडरानेंय ।
ऐसी गर्जती पुराणें ।।
चोखाळिल्या वाटा ।
न लगे पुसाव्या धोपटा ।।
झळकती पताका ।
गरूडटकें म्हणे तुका ।
या उक्तीप्रमाणे तुकाराम…तुकाराम…तुकारामचा… जयघोष करत पांडुरंगाच्या दर्शनाची आस ठेवून जगद्‌गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळा मजल-दरमजल करत सोमवारी (दि. 1) अवघड चढणीचा रोटी घाट पार करून बारामती तालुक्‍यात दाखल झाला. ज्येष्ठातील मेघांच्या छत्रछायेखाली पंढरीच्या वाटेवरील वारकरी मंडळींनी अवघड चढणीचा घाट झपाझप पावले टाकत पार केला. विठ्ठल दर्शनाच्या आशेने निघालेल्या वारकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता, तर मध्येच फुगडीच्या खेळात रंगून वारकरी श्रमपरिहार करत होते. पालखी ओढण्यासाठी मानाच्या बैलासोबत परिसरातील शेतकऱ्यांच्या आणखी चार बैलजोड्या जुंपल्या होत्या.

संत तुकाराम महाराज यांची पालखी रविवारी (दि. 30) वरवंडचा सायंकाळचा मुक्‍काम आटोपून, आज सकाळी आठच्या सुमारास पाटसकडे मार्गस्थ झाली, यावेळी हातात भगव्या पताका, कपाळी गंध, संत तुकाराम महाराज आणि विठ्ठल रुक्‍मिणी यांच्या नामाचा जयघोष करत भक्‍तिमय वातावरणात पालखी मार्गस्थ झाली. पालखीचा दुपारचा विसावा नेहमीप्रमाणे पाटसमध्ये पार पडला, यावेळी परिसरातील हजारो भक्‍तांनी पालखीचे आणि वारकऱ्यांचे स्वागत केले. यावेळी पालखी पाटसचे ग्रामदेवत नागेश्‍वर मंदिरामध्ये दर्शनासाठी आणि विसाव्यासाठी ठेवण्यात आली. दरम्यान पाटस परिसरातील हजारो ग्रामस्थांनी संत तुकाराम महाराज यांच्या पादुकांचे आणि मानाच्या अश्‍वांचे दर्शन घेतले. यावेळी भाविकांनी ठिकठिकाणी वारकऱ्यांना चहा, नाष्टा, पाण्याचे वाटप करून केले..

संत तुकाराम महाराज यांच्या पालखी महामार्गावरील प्रवासामधील पहिला घाट म्हणून रोटी घाटाची ओळख आहे. पाटसपासून व पुणे-सोलापूर महामार्गापासून काहीच अंतरावर असलेल्या रोटी घाटामध्ये संत तुकाराम महाराजांच्या पालखीला मानाच्या बैलजोडीसोबत आणखी चार बैलांच्या जोड्या जोडून पालखी रथाने शिस्तबद्ध पद्धतीने घाट सर केला.
वारकऱ्यांच्या आरोग्याची तपासणी करण्यासाठी या ठिकाणी सेवा थांबे उभारले होते. रोटीच्या घाट माथ्यावर काही दिंड्यांनी दुपारची न्याहरी केली. नंतर पालखी मार्गक्रमण करत हिंगणीगाडा, वासुंदे येथे भाविकांच्या दर्शनासाठी थांबवण्यात आला. यानंतर गुंजखिळा येथे बारामती तालुक्‍यातील प्रशासकीय अधिकारी, विविध पक्षांचे पदाधिकारी, राजकीय मान्यवरांनी स्वागत करून पालखी सोहळा उंडवडी मुक्‍कामी रवाना झाली.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)