मिनिटभर उशिरा आलेल्या कर्मचाऱ्यांना घरी पाठविले

अन्यथा आयोगाकडे मागणार दाद
थम्ब करण्यापासून रोखले : भाजप नगरसेवकाचा उद्दामपणा, आयुक्‍तांना नोटीस

पिंपरी  – आरोग्य विभागात काम करणारे बारा सफाई कर्मचारी एक मिनिट उशिराने आल्याने नगरसेवकाने त्यांना “थम्ब’ करु न देता घरी हाकलले. ही घटना पिंपळे गुरव (प्रभाग 29) मध्ये नुकतीच घडली. या प्रकरणी सफाई कामगारांनी आरोग्य विभाग तक्रार निवारण समितीकडे न्यायाची मागणी केली आहे.

भाजप शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांचे वास्तव्य असलेल्या पिंपळे – गुरव प्रभागाचे जनप्रतिनिधित्व भाजपचे चार नगरसेवक करत आहेत. सकाळी सात ते दुपारी दोन अशी त्यांची कामकाजाची वेळ आहे. दररोज सकाळी सातच्या सुमारास या कामगारांना आरोग्य कोठीत “थम्ब’ करणे बंधनकारक आहे. थम्बसाठी या कर्मचाऱ्यांना दहा मिनिटांची सवलत देण्यात आली आहे.
मंगळवारी (दि.25) सकाळी सातच्या सुमारास भाजप नगरसेवकाने आरोग्य कोठीला आकस्मिकपणे भेट दिली. यावेळी एक मिनिट उशिराने आलेल्या 12 कर्मचाऱ्यांना या नगरसेवकाने थम्ब करण्यापासून रोखले. तसेच, त्या दिवशी कामावरुन घरी हुसकावले. या बारा कर्मचाऱ्यांमध्ये महापालिकेच्या सहा तर कंत्राटी तत्त्वावरील सहा कामागारांचा समावेश आहे.

कामगारांनी आरोग्य विभाग तक्रार निवारण समितीचे उपाध्यक्ष ऍड.सागर चरण यांच्याकडे
तक्रार केली. ऍड.सागर चरण यांनी महापालिका आयुक्‍त श्रावण हर्डीकर यांना नोटीस बजाविली आहे. त्यात म्हटले आहे की, पिंपळे – गुरव प्रभागात दुसऱ्यांदा ही घटना घडली आहे. वर्षभरापुर्वीही एका लोकप्रतिनिधीने बारा सफाई कर्मचाऱ्यांना अपशब्द उच्चारत घरी हुसकावले होते. आरोग्य विभागाने राजकीय दबावापुढे झुकत कामगारांना कारणे दाखवा नोटीस बजाविली. तसेच, एका दिवसाचे वेतन कापले. या प्रकाराची पुनरावृत्ती झाली आहे.

आयुक्‍तांना दिलेल्या नोटीसमध्ये म्हटले आहे की, सफाई कर्मचाऱ्यांना थम्ब करण्यास 10 मिनिटांची मुभा आहे. सफाई कामगाराने बेशिस्त वर्तन किंवा गैरवर्तणूक केल्यास महापालिका आयुक्‍त त्यांच्यावर प्रशासकीय कारवाई करु शकतात. मात्र, थेट घरी पाठविण्याचा अधिकार कुणालाही नाही. या प्रकरणाची आयुक्‍तांनी गंभीर दखल घेऊन असे प्रकार घडणार नाहीत, याची सक्‍त ताकीद लोकप्रतिनिधींना, अधिकाऱ्यांना द्यावी. तसेच, या सफाई कर्मचाऱ्यांना दोन दिवसांचे वेतन द्यावे, अन्यथा राष्ट्रीय अनुसूचित जाती, जनजाती आयोगाकडे दाद मागावी लागेल, असा इशारा दिला आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.