पदपथांवर ठेचकाळताहेत नागरिक

पालिकेच्या निकृष्ट कामाचा परिणाम : ठेकेदारावर अधिकारी, नगरसेवकांची कृपादृष्टी?

सांगवी – सांगवी, पिंपळे गुरव परिसरात रस्ते कॉंक्रीटीकरणाची कामे सुरू असून कामे उरकण्याच्या नादात त्यांचा दर्जा घसरत आहे. याकडे ना महापालिका प्रशासनाने लक्ष आहे, ना लोकप्रतिनिधींचे. परिणामी चेंबरची झाकणे पदपथाच्या वर आल्याने नागरिक ठेच लागून जखमी होत आहेत.

गेल्या सहा महिन्यांपेक्षा अधिक दिवसापासून नवी सांगवी, पिंपळे गुरव परिसरात ऐन पावसाळ्यातही ही कामे सुरूच आहेत. विशेष म्हणजे पिंपळे गुरवमधील महापालिका शाळा ते काटेपुरम चौकादरम्यानचे काम खूपच खोळंबले आहे. निम्म्या रस्त्याचे कॉंक्रीटीकरण झाले आहे. एका बाजूने पदपथाचेही काम उरकण्यात आले आहे. मात्र, हे काम उरकण्याच्या नादात पदपथावरील सिमेंटचे ब्लॉक खाली वर झाले आहेत. काही ठिकाणी सिमेंट ब्लॉक निघाले आहेत. पदपथाच्या खालून जाणाऱ्या चेंबरची झाकणे पदपथाच्या समांतर असणे आवश्‍यक असते. मात्र, या ठिकाणी करण्यात आलेल्या पदपथाचे काम करताना चेंबरची झाकणे पदपथाला समांतर राहतील, अशी कोणतीच काळजी ठेकेदाराने घेतलेली दिसत नाही.

परिणामी या पदपथावरून जाणारे ज्येष्ठ नागरिक, शाळकरी मुले, महिला अशा सर्वानाच जपून पावले टाकावी लागत आहेत. चेंबरची झाकणे वर आलेली स्पष्ट दिसत असूनही, या कामाच्या ठिकाणी भेट देणारे महापालिकेचे अधिकारी, स्थानिक लोकप्रतिनिधी यांचे मात्र याकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे. महापालिका अधिकारी आणि स्थानिक लोकप्रतिनिधी हेच संबंधित ठेकेदाराला चुकीच्या कामाबद्दल पाठीशी घालत असतील, तर याबाबत नेमकी तक्रार कुणाकडे करायची, असा प्रश्‍न नागरिकांना पडला आहे.

ठेकेदाराला काम दिले म्हणजे आपली जबाबदारी संपली, अशा थाटात महापालिका अधिकारी वावरत आहेत आणि अधिकारी आणि ठेकेदार संबंधित काम बघून घेतील, आपला या कामांशी संबंध नसल्याची भावना नगरसेवकांची झाली आहे. अधिकारी आणि नगरसेवकांचा ठेकेदारावर अंध विश्‍वास असल्याने कामे निकृष्ट दर्जाची होत आहेत.

– अमरसिंग आदियाल, सामाजिक कार्यकर्ते.

Leave A Reply

Your email address will not be published.