वीर धरणातील पाणी पातळी खालावली

शिल्लक पाणीसाठा पिण्यासाठी राखीव ठेवण्याची मागणी

परिंचे- सासवड शहराला सध्या वीर जलाशयातून पाणीपुरवठा करण्यात येत असून या धरणाच्या दोन्ही कालव्यातून मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात आल्याने पाणीपातळी खालावली आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार पाऊस लांबल्यास वीर योजनेवर अवलंबून असलेल्या सासवडसह इतर गावांच्या पाणी योजना अडचणीत येऊ शकतात. तसेच आषाढी पालखी सोहळ्यालाही पाण्याअभावी झळ बसू शकते. त्यामुळे वीर धरणामधील पाणी राखीव ठेवण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

साडे नऊ टीएमसी क्षमतेच्या वीर धरणात सध्या एक टीएमसीहून कमी पाणीसाठा शिल्लक आहे. निरा डावा आणि उजवा असे दोन्ही कालवा सुरू असल्याने पाणीसाठा कमी झाला आहे. उजवा बंद आहे. मात्र, डावा कालवा अद्याप सुरू आहे. वीर धरणावर सासवडला करण्यात येणाऱ्या पाणीपुरवठा योजनेच्या जॅकवेलची चारी उघडी पडली असून यात 4 फूटापर्यंत पाणी आहे. सासवडला दररोज 60 लाख लिटर पाण्याची गरज असून वीर योजनेतून दररोज 45 लाख लिटर पाणी उचलून दोन दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. सासवडसाठी गराडे आणि घोरवडी पाझर तलावातील पाणी तीन महिन्यांपूर्वीच बंद केले आहे. त्यामुळे आता सासवड शहराला पिण्याच्या पाण्यासाठी केवळ वीर योजनेवर अवलंबून रहावे लागणार आहे.

हवामान विभागाने यंदा पावसाचे आगमन उशीरा होणार असल्याचे सांगितले आहे. गेली सलग चार वर्षे पुरंदरमध्ये पावसाचे आगमन वेळेवर होत नाही. तसेच पावसाचे प्रमाण कमी होत असल्याने खरीप हंगाम वाया जात आहे. त्यात सासवडला संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा लाखो वारकऱ्यांसह दोन दिवस मुक्कामी येणार आहे. तसेच संत सोपानकाका महाराजांचा पालखी सोहळा लाखो वारकऱ्यांसह आषाढीवारीसाठी सासवडहून प्रस्थान ठेवणार आहे. या दोन दिवसांत सासवडमध्ये सहा लाखांहून जास्त वारकरी उपस्थित असतात. त्यामुळे पाण्याची मोठी गरज असते.

वीर जलाशयातील पाणीसाठा राखीव ठेवण्याची मागणी सासवडचे नगरसेवक करीत आहेत. वीर जलाशयावरील सासवडच्या जॅकवेलची नगरसेवक अजित जगताप, सुहास लांडगे, विजय वढणे, मनोहर जगताप यांनी शनिवारी (दि. 18) पाहणी केली.

  • अन्यथा वीर धरणातून पाणी सोडावे लागणार
    दुष्काळामुळे तालुक्‍यात इतर कोणताही जलस्त्रोत उपलब्ध नसल्याने सासवडला वीर योजनेवरच अवलंबून रहावे लागणार असल्याने धरणाचे कालवे बंद करून येथील पाणीसाठा सासवड तसेच परिसरातील पिण्याच्या पाण्याच्या योजनांसाठी राखीव ठेवण्याची मागणी केली जात आहे. तसेच पाऊस वेळेत न झाल्यास आषाढी वारीच्या वेळेस माऊलींच्या पादुकांना निरास्नान घालण्यासाठी वीर धरणातून निरा नदीत पाणी सोडावे लागणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)