विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर कामशेतमध्ये पोलिसांचे संचलन

कामशेत – विधानसभेसाठी सोमवारी (दि. 21) मतदान होत आहे. या मतदानाच्या पार्श्‍वभूमीवर कामशेत पोलिसांनी कामशेत शहर सामाजिक व राजकीयदृष्ट्‌या संवेदनशील मतदारसंघांमध्ये तसेच पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ग्रामीण भागात शुक्रवारी (दि. 18) संचलन केले. विधानसभा निवडणुकीत कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी म्हणून हे संचलन करण्यात आले.

कामशेत पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुमारे 43 गावांचा समावेश असून, सुमारे 49 निवडणूक बूथ आहेत. कामशेत शहरातील केंद्रे निवडणूक आयोगाने अति संवेदनशील जाहीर केले आहे. तर कोथुर्णे, कडधे, नाणे, कांब्रे, गोवित्री, चिखलसे संवेदनशील आहेत. या ठिकाणी शुक्रवारी पोलीस ठाण्यातील दोन अधिकारी, 10 कर्मचारी सीआरपीएफचे अधिकारी, जवान, रिक्रुट कर्मचारी आदीं सुमारे 65 जणांच्या टीमने शुक्रवारी सकाळपासून संवेदनशील गावांमध्ये संचलन केले. या वेळी नागरिकांना, मतदारांना सूचना करण्यात आल्या.

मतदानापासून मतमोजणीपर्यंतची निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडावी, या प्रक्रियेला कोणत्याही अनुचित घटनेने गालबोट लागू नये, कोणत्याही प्रकारचे दडपण न येता मतदारांनी निर्भीडपणे मतदानाचा हक्‍क बजावावा यासाठी पोलिसांनी कामशेत शहर तसेच दुर्गम ग्रामीण भागात कडेकोट बंदोबस्त ठेवला असल्याची माहिती कामशेत पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल दबडे यांनी दिली.

तसेच कामशेतमध्ये स्थानिक पोलिसांबरोबरच अन्य बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. अतिरिक्‍त अधिकारी व कर्मचाऱ्यांना मतदारसंघाची भौगोलिक रचना कळावी, पोलिसांचे मनोबल आणखी दृढ व्हावे, सर्वात महत्त्वाचे म्हणजे असामाजिक घटक, गुन्हेगारी पार्श्‍वभूमी असलेल्यांच्या मनात पोलिसांचा धाक निर्माण व्हावा हा पथ संचलनामागील प्रमुख उद्दिष्टे आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.