पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघात भाजपला मिळाले बळ

कॉंग्रेसचे रशीद शेख, शैलेंद्र बिडकर, रूपाली बिडकर भाजपमध्ये

पुणे कॅन्टोन्मेंट – कॅन्टोन्मेंट मतदारसंघात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. भाजपने या मतदारसंघात कॉंग्रेसला आणखी एक धक्का दिला असून महापालिकेतील स्थायी समितीचे माजी अध्यक्ष आणि कॉंग्रेसचे माजी नगरसेवक रशीद शेख यांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला आहे. शेख यांच्यासह पुणे कॅन्टोन्मेंटचे माजी उपाध्यक्ष कॉंग्रेसचे शैलेंद्र बिडकर आणि विद्यमान नगरसेविका रूपाली बिडकर यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे भाजपला मोठा फायदा होण्याची शक्‍यता आहे. मागील आठवड्यातच सदानंद शेट्टी आणि सुधीर जानज्योत हे दोन माजी नगरसेवक भाजपमध्ये गेले आहेत.

रशीद शेख हे कॉंग्रेसचे शहरातील ज्येष्ठ नेते असून 25 वर्षे नगरसेवक राहिले आहेत. त्यांनी शहर सुधारणा समितीचे अध्यक्ष, भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयाचे अध्यक्ष, शहर जिल्हा कॉंग्रेसचे खजिनदार, अल्पसंख्याक आघाडीचे अध्यक्ष अशा महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे. रशीद यांचे बंधू रफीक शेख महापालिकेत कॉंग्रेसचे विद्यमान नगरसेवक आहेत. बिडकर हेदेखील वजनदार नेते, कॅन्टोन्मेंटचे माजी उपाध्यक्ष राहिले आहेत. शेख, बिडकर यांनी खासदार गिरीश बापट, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, सरचिटणीस गणेश बिडकर, महायुतीचे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार सुनील कांबळे यांच्या उपस्थितीत भाजप प्रवेश केला आहे.

शेख हे कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते असून मतदारसंघात त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे. तो आता भाजपसोबत जोडला जाणार असून या निवडणुकीत भाजपला फायदा होणार आहे. केंद्र व राज्यात भाजपची सत्ता, पक्षाची कार्यपद्धती तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कामाची सचोटी, पारदर्शकता, विकासकामे यामुळे सर्वच राजकीय पक्षांतील पदाधिकारी भाजपला पसंती देत आहेत. या सर्वांना सोबत घेऊन मतदारसंघाचा विकास करणे हेच आपले उद्दिष्ट आहे.
– सुनील कांबळे, महायुती उमेदवार, पुणे कॅन्टोन्मेंट

Leave A Reply

Your email address will not be published.