विद्यार्थिनीचा विनयभंग करणाऱ्या मुख्याध्यापकाला पाच वर्षे सक्तमजुरी

सातारा, दि 20 (प्रतिनिधी)

सातारा तालुक्‍यातील एका शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थिनीचा विनयभंग करणाऱ्या मुख्याध्यापकाला पाच वर्षे सक्तमजुरीची शिक्षा व दहा हजार रुपये दंड ठोठावण्यात आला. संजय प्रतापराव जाधव (वय 50 रा. नांदगाव, ता. सातारा) असे शिक्षा झालेल्या मुख्याध्यापकाचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, आरोपी संजय हा सातारा तालुक्‍यातील एका शाळेत मुख्याध्यापक म्हणून नोकरीस होता. शाळेच्या आवारातील संगणक खोलीत दि. 9 ऑक्‍टोंबर 2016 रोजी विद्यार्थ्यांचा तास सुरू होता.

वर्गात अंधार पडल्याने शिक्षकांनी खिडकीचा दरवाजा उघडण्यास सांगितल्याने पीडित मुलगी वर्गाबाहेर गेली होती. त्यावेळी आरोपी जाधव याने त्या विद्यार्थीनीचा विनयभंग केला.

याबाबत विद्यार्थीनीने घरातील लोकांना सांगितल्यानंतर दि. 10 ऑक्‍टोंबर 2016 रोजी बोरगाव पोलीस ठाण्यात त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला होता.

त्यानंतर आरोपीला अटक करून तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक एन. आर. चौखंडे यांनी तपास केला. तपास झाल्यानंतर आरोपीविरोधात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.

न्यायाधीश एन. एल. मोरे यांनी सुनावणीदरम्यान समोर आलेले पुरावे, साक्षी तसेच दोन्ही बाजूचा युक्तीवाद ऐकून आरोपीला पाच वर्ष सक्तमजुरीची शिक्षा व दहा हजार रुपये दंड तसेच दंड न दिल्यास तीन महिने साधी कैद अशी शिक्षा सुनावली. या खटल्यात पोलीस प्रॉसिक्‍यूशन स्कॉडच्या महिला पोलीस सुनीता देखणे यांनी काम पाहिले.

Leave A Reply

Your email address will not be published.