- नगरसदस्य गौरी मावकर, हारपुडे, जयश्री आहेर यांची हकालपट्टी करणार
- विरोधी मतदान करणाऱ्या नगरसेवकांची पदे रद्दचा प्रस्ताव पाठविणार
- भाजपची पत्रकार परिषदेत घोषणा
लोणावळा – लोणावळा नगरपरिषदेच्या विषय समिती सभापती पदाच्या निवडणुकीत भाजपचे गटनेते व मित्र पक्षांच्या उमेदवारांच्या विरोधात मतदान करत विरोधी पक्षाला मदत करणाऱ्या महिला नगरसेविका गौरी मावकर व मतदानाच्या वेळी सभागृहात गैरहजर राहणारे नगरसेवक भरत हारपुडे व जयश्री आहेर या तीन जणांची भाजपमधून हकालपट्टी केली. याशिवाय त्या नगरसेवकांचे पद रद्द करण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकारी पुणे यांच्याकडे पाठविण्यात येणार आहे, अशी माहिती भाजपा शहराध्यक्ष रामविलास खंडेलवाल, नगराध्यक्षा सुरेखा जाधव, उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी व गटनेते देविदास कडू यांनी पत्रकार परिषदेत दिली.
भाजपच्या तीनही नगरसेवकांनी जाणिवपूर्वक ठरवून आर्थिक देवाणघेवाण करत भाजपाचे गटनेते देविदास कडू, सहयोगी पक्ष असलेल्या आरपीआयचे नगरसेवक दिलीप दामोदरे व कॉंग्रेसचे नगरसेवक सुधीर शिर्के यांच्या विरोधात मतदान केले, गैरहजर राहिले. हा सरळसरळ विश्वासघात असल्याने या तिन्ही लोकप्रतिनिधींची पक्षातून हकालपट्टी करण्यात येणार असल्याचे या पत्रकार परिषदेत सांगण्यात आले.
लोणावळा नगरपरिषदेत भाजप, आरपीआय व कॉंग्रेस यांची सत्ता असून, शिवसेना विरोधात आहे. विषय समितीमधील सदस्य हे सभापतींना मतदान करतात. याची कल्पना असल्याने समितीमध्ये सदस्य होण्याकरिता बंडखोरी करणाऱ्या नगरसेविकांनी रडून स्वतःची नावे घालून घेतली. सभागृहात येईपर्यंत ते आमच्या सोबत होते. एकत्र जेवण करुन एकमेकांला हात मिळवून शुभेच्छा देत सभागृहात गेल्यानंतर गौरी मावकर यांनी विरोधात मतदान केले. तर भरत हारपुडे व जयश्री आहेर हे सभागृहात आलेच नाहीत. सोबत राहून गोड बोलून त्यांनी बंडखोरी केल्याने भाजपा, आरपीआय व कॉंग्रेस यांना प्रत्येकी एका सभापती पदाला मुकावे लागले. आमचे नगरसेवक विकले गेल्याने आमच्या गटनेत्यासह मित्र पक्षांना सभापती पदाला मुकावे लागले, अशा शब्दात नगराध्यक्षा सुरेखा जाधव व श्रीधर पुजारी यांनी पत्रकार परिषदेत नाराजी व्यक्त केली.
भाजपाचे शहराध्यक्ष रामविलास खंडेलवाल यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या पत्रकार परिषदेला नगराध्यक्षा सुरेखा जाधव, उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी, गटनेते देविदास कडू, नगरसेवक राजाभाऊ खळदकर, मंदा सोनवणे, रचना सिनकर, ब्रिंदा गणात्रा, आरपीआयचे नगरसेवक दिलीप दामोदरे, कॉंग्रेसचे नगरसेवक निखिल कविश्वर, सुधीर शिर्के, विजय सिनकर आदी उपस्थित होते.