लखनौ : अयोध्येतील राममंदिर उभारणीसाठी अष्टधातूचे एक प्राचीन नाणे देण्याचा संकल्प सईद महंमद इस्लाम या मुस्लिम व्यक्तीने केला आहे. ही व्यक्ती उत्तर प्रदेशातील आझमगढमध्ये वास्तव्यास आहे. या नाण्यावर प्रभू रामचंद्र, सीता आणि हनुमानाचे चित्र असून या नाण्याची किंमत लक्षावधी रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे. सईद यांच्या घराचे बाधकाम करताना ते नाणे त्यांना पाया खोदताना सापडले होते.
घराचा पाया खोदताना 30 नोव्हेंबर 2019 रोजी मला दोन नाणी सापडली होती. त्यापैकी एक मंदीराच्या उभारणीसाठी देण्याचा मी संकल्प केला आहे. लवकरच मी आयोध्येला जाणार आहे. त्यावेळी मी ते राम तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे अध्यक्ष महंत नृत्य गोपाल दास यांच्याकडे देणार आहे, असे सईद यांनी सांगितले.
मध्यंतरी ते काही कामानिमित्त बाहेर गेले होते. त्यावेळी त्यांची पत्नी कनिझा फतिमा यांनी एका सराफाला एक नाणे विकले. त्याची किंमत तीन लाख रुपये आली. या नाण्याची विक्री करून त्या निधीचा वापर मंदिर उभारणीसाठी करावा, अशी विनंती आपण महंतांना करणार आहे. आपल्या या योगदानामुळे अन्य मुस्लिमांनाही मंदिर उभारणीत योगदान देण्याची प्रेरणा मिळेल, अशी आशा असल्याचे त्यांनी सांगितले.