राज्यभरातील एसटी बसस्थानके कात टाकणार

पहिल्या टप्प्यात शिवाजीनगर, स्वारगेटसह 5 स्थानकांचा समावेश

पुणे – कराड येथील सुसज्ज बसस्थानकाचा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर प्रवाशांसह वाहक आणि चालकांनाही दर्जेदार सेवा देण्यासाठी एसटी महामंडळाने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून राज्यातील सर्व बसस्थानकांचे नूतनीकरण करण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे. ही सर्व बसस्थानके सर्व सुविधांनी सुसज्ज करण्यात येणार आहेत, विशेष म्हणजे दिवसभर दमलेल्या वाहक आणि चालकांसाठी वातानुकूलित आणि आरामदायी विश्रांतीगृहे बांधण्यात येणार आहेत.

पहिल्या टप्प्यात राज्यातील पाच बसस्थानकांचे नूतनीकरण करण्यात येणार असून त्यासाठी सामजिक संस्था आणि अन्य संस्थांचीही मदत घेण्यात येणार आहे. गेल्या काही वर्षांच्या कालावधीत एसटी महामंडळाने कात टाकण्यास सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून महामंडळाने आपल्या ताफ्यात आरामदायी आणि वातानुकूलित बसेस आणल्या आहेत, त्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. मात्र, यातून महामंडळाचा तोटा तब्बल 19 हजार कोटींवर जाऊन पोचला आहे. तरीही न डगमगता महामंडळाने दर्जेदार सुविधा देण्यावर भर दिला आहे. पण, महामंडळाच्या राज्यातील बसस्थानकांची अवस्था अतिशय दयनीय अशी झाली आहे. त्याचाच एक भाग म्हणून महामंडळाने कराड येथील बसस्थानकाचे सुसज्ज असे नूतनीकरण केले आहे, विशेष म्हणजे, एका सेवानिवृत्त कर्मचाऱ्याच्या मुलाने वडिलांच्या स्मरणार्थ या बसस्थानकामध्ये वातानुकूलित असे विश्रांतीगृह बांधून दिले आहे.

कराड येथील या बसस्थानकाची राज्यभरात चांगलीच चर्चा आहे. त्यामुळे या बसस्थानकाच्या धर्तीवर राज्यात अन्य ठिकाणीही अशाच पद्धतीचे बसस्थानक बांधण्याचा महामंडळ गांभीर्याने विचार करत आहे. त्यानुसार पुण्यातील शिवाजीनगर आणि स्वारगेटसह औरंगाबाद, नागपूर आणि कोल्हापूर येथील बसस्थानकाचे अशा पद्धतीने नूतनीकरण करण्यात येणार आहे. त्यानुसार वाहक आणि चालकांसाठी आरामदायी तसेच वातानुकूलित विश्रांतीगृह, सुलभ शौचालय आणि अन्य सुविधा देण्यात येणार आहेत. या नूतनीकरणाचे काम लवकरच सुरू करण्यात येणार आहे, त्यानंतर टप्प्याटप्प्याने अन्य बसस्थानकांचेही अशाच पद्धतीने नूतनीकरण करण्यात येणार आहे, अशी माहिती एसटी महामंडळाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक रणजितसिंह देओल यांनी दिली.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.