रागातून बापाने मुलीला बुडविले पाण्यात

पुणे – वडिलांकडे जाण्यास नकार देत चिमुकली रडल्याचे पाहून रस्त्यावरील लोक हसल्याने मुलीला पित्याने बेदम मारहाण करीत तिला पाण्यात बुडविल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एवढेच नव्हे तर बेशुद्ध पडलेल्या मुलीवर केवळ प्रथमोपचार करून वडील तिला घरी सोडून गेले.

याप्रकरणी येरवडा पोलिसांनी ताडीवाला रस्त्यावर राहणाऱ्या पित्याला अटक केली आहे. येरवड्यातील पोते वस्ती येथे शनिवारी दुपारी दोनच्या सुमारास हा प्रकार घडला. जखमी झालेल्या अडीच वर्षांच्या मुलीच्या आईने याबाबत फिर्याद दिली आहे. सविस्तर माहिती अशी की, घटनेच्या दिवशी आरोपी व फिर्यादी हे मुलीला घेऊन खरेदीसाठी गेले होते. खरेदी झाल्यानंतर फिर्यादी यांच्या हातात बाजाराच्या पिशव्या असल्याने आरोपीने मुलीला उचलून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र वडिलांकडे जाण्यास नकार देत ती रडू लागली. हा सर्व प्रकार पाहून रस्त्यावरील लोक त्याकडे पाहून हसले. त्यामुळे चिडलेल्या आरोपीने घरी आल्यानंतर चिमुकलीला किचनमध्ये कोंडले व तिला हाताने मारण्यास सुरवात केली. फिर्यादी या तिला मारू नका’ अशा विनंती करीत असताना त्याने मुलीला कपडे धुण्याच्या खडबडीत ठिकाणी आपटले व तिच्या अंगावर पाय ठेवून जमिनीवर रडगले. त्यानंतर तिला पाण्यात बुडविले. मुलगी बेशुद्ध पडल्याचे पाहून तिला फिर्यादींच्या ताब्यात दिले. त्यावेळी तिच्या कपाळ, गाल, ओठ आणि पाठीतून रक्त येत होते. फिर्यादी यांनी मुलीला रुग्णालयात घेऊन जाण्याची विनंती केल्यानंतर आरोपी तिला जवळच्या खासगी रुग्णालयात घेऊन गेला. तेथे तिच्यावर प्रथमोपचार करण्यात आले. मात्र, पुढील उपचार न करता तो तिला पुन्हा घरी घेऊन आला व मुलीला सोडून निघून गेला, असे फिर्यादीत नमूद आहे. अटक केल्यानंतर न्यायालयात हजर केले असता आरोपीला 25 मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक आर. व्ही. शेवते करीत आहेत.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)