‘महाशयां’कडून ऐतिहासिक वास्तूंचे विद्रुपीकरण

अस्वच्छता, पोस्टर लावणे आणि दगडाने कोरीव काम करण्यासारखे प्रकार


पर्यटकांनी ऐतिहासिक वास्तूंचा मान ठेवण्याचे आवाहन

पुणे – सुट्टीचा आनंद घेण्यासाठी अनेक पर्यटक गड-किल्ले किंवा अन्य पर्यटनस्थळी फिरायला जातात. मात्र, याठिकाणी गेल्यावर काही “महाशय’ ऐतिहासिक वास्तूंवर दगडाने कोरीव काम करणे किंवा पोस्टर लावून सौंदर्य खराब करताना दिसतात. तर स्वत:बरोबर नेलेल्या प्लॅस्टिक पाण्याच्या बाटल्या आणि पिशव्या उघड्यावर टाकतात. वाऱ्यामुळे त्या तळ्यामध्ये गेल्यामुळे पाणी अस्वच्छ होते. त्यामुळे पर्यटकांनी ऐतिहासिक वास्तूंच्या ठिकाणी जाताना इतिहास पाहण्यासाठी आणि तो जतन करण्यासाठी जावा, अस्वच्छ करण्यासाठी जावू नये, असे आवाहन इतिहास तज्ज्ञ आणि पोलिसांकडून करण्यात आले.

शाळा-महाविद्यालयांना उन्हाळी सुट्ट्या लागल्या आहेत. त्यामुळे पुणे जिल्ह्यासह आसपासच्या जिल्ह्यांतील पर्यटनस्थळांवर पर्यटकांनी मोठी गर्दी केली आहे. विशेषत: समुद्र किनारा आणि गडकिल्ल्यांवर पर्यटकांची अधिक गर्दी आहे. सिंहगड, तोरणा, राजगड, लोहगड, रायगड, लिंगाणा या किल्ल्यांसह अजिंठा-वेरूळ आणि कारले-भाज्याच्या लेण्या, क्रांतीकारकांचे वास्तू यासह अन्य ऐतिहासिक वास्तू पाहण्यासाठी दररोज हजारो पर्यटक येतात. मात्र, शहरालगत असलेल्या गडकिल्ल्यांवर अनुचित प्रकार घडू नये, दगडांवर नावे लिहू नये यासाठी दुर्गप्रेमी संघटना सरसावले आहेत. तर नागरिकांमध्येही त्याबाबत जागृती झाल्याचे दिसून येते. मात्र, ज्या गडांवर फारशी वर्दळ नसते, त्याठिकाणी काही महाशय दगडाने नावे लिहित असल्याचे दिसून येते. एवढच नव्हे तर दारूच्या पार्ट्या करून धिंगाणा घालणे असे प्रकारही घडत आहेत.

या सर्व विकृतीविरोधात काही तरुणांनी आवाज उठवला असून ऐतिहासिक वास्तूंच्या ठिकाणी विकृती, अश्‍लिल चाळे आणि अस्वच्छता करणाऱ्यांना मज्जाव करत आहे. वेळप्रसंगी चोपही दिला जात आहे. त्यातून तरुणांची एक चळवळ उभी राहात असून गड-किल्ले आणि ऐतिहासिक वास्तूंचे जतन करण्यासाठी ही चळवळ खऱ्या अर्थाने गरजेची आहे. त्यामुळे पर्यटकांनीही सावधान रहावे, वास्तूंचे सौंदर्य खराब करताना दिसला तर दंडात्नक कारवाईला सामोरे जावे लागणार असून त्याबाबत राज्य शासनाने ठोस पावले उचलली असून काही ठिकाणी सीसीटीव्ही आणि सुरक्षारक्षक नेमण्यात आले आहेत.

पूर्वी गड-किल्ल्यांवर पर्यटकांची फारशी वर्दळ नसायची. त्यामुळे दगडांवर नावे कोरण्यासारखे प्रकार घडत होते. मात्र, आता वर्दळ वाढली असून स्थानिक लोकांच्या देखरेखीमुळे हे प्रकार कमी झाले आहेत. दरम्यान, प्रत्येक पर्यटकाने ही आपली वास्तू आहे, आपल्या राज्याचा इतिहास आहे, या भावनेतून पर्यटन करावे आणि स्वच्छता राखावी.
– नंदकिशोर मते, इतिहासाचे अभ्यासक


गड-किल्ल्यांवर पर्यटनासाठी जाताना नागरिकांनी स्वत:लाच शिस्त लावली तर अनेक अडचणी सुटतील. सध्या वाढत्या पर्यटनामुळे वाहतूक कोंडीचा प्रश्‍न गंभीर बनला आहे. किल्ल्यांवर येणारे रस्ते मोठे होवू शकत नाही. त्यामुळे पर्यटकांनी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केलेल्या सूचनांचे पालन करावे. सिगारेट ओढणारे तरूण किल्ल्यांवर येतात. त्यामुळे तरुणांची जबाबदारीचे भान ठेवून किल्ल्यांवर यावे.
– दीपक पवार, वनपरिक्षेत्र अधिकारी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)