विदर्भ, मध्य महाराष्ट्रातही उष्णतेची लाट

 पुढील दोन दिवस भीषण गरमी, उकाड्याचे

पुणे – राज्यातील विदर्भापाठोपाठ मध्य महाराष्ट्रातील काही भागात उष्णतेची लाट आली होती. पुढील दोन दिवस ही लाट राहण्याची शक्‍यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे. दरम्यान, रविवारी (दि. 19) चंद्रपूर येथे सर्वाधिक 45.6 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. तर किमान तापमानातही दोन ते तीन अंशांनी वाढ झाल्यामुळे रात्रीचा उकाडा वाढला आहे.

गेल्या 24 तासांत मध्य महाराष्ट्राच्या काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय वाढ झाली आहे. तर विदर्भाच्या काही भागात आणि मध्य महाराष्ट्रातील उर्वरीत भागात लक्षणीय वाढ झाली आहे. त्यामुळे आज मध्य महाराष्ट्रातील सोलापूर, जळगाव, मालेगाव, सांगली आणि अहमदनगर येथे उष्णतेची लाट होती. कमाल तापमान 43 अंशापर्यंत जावून पोहचले होते. तर विदर्भातील बहुतांश शहरातील कमाल तापमान 43 ते 44 अंशाच्या पुढे आहे. दि. 22 नंतर कोकण-गोव्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल आणि अन्य राज्यातील हवामान कोरडे राहिल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

राज्यातील काही प्रमुख शहरातील कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये)
चंद्रपूर 45.6, ब्रह्मपुरी 45.5, वर्धा 44.5, नागपूर 44.1, परभणी 44, सोलापूर आणि अकोला 43.8, अमरावती 43.6, गोंदिया 43, वाशिम 42.8, बीड 42.7, जळगाव 42.6, नांदेड आणि यवतमाळ 42.5, सांगली 42, मालेगाव 41.4, कोल्हापूर 41.2, पुणे 41, औरंगाबाद 40.8, बुलढाणा 40.7, सातारा 40.4, नाशिक 39.2,

कोल्हापूर आणि सांगलीमध्ये तापमानाने चाळिशीच्या पुढे मजल मारली
मागील दोन महिन्यांत 38 अंशाच्या पुढे तापमान न गेलेल्या कोल्हापूरमध्ये आज 41.2 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. तसेच सांगली जिल्ह्यातील कमाल तापमानाने चाळिसी पार केली असून, तब्बल 42 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. कोल्हापूर आणि सांगलीसाठी हे तापमान उच्चांकी असून, शहरे चांगलीच तापली आहे. त्यापाठोपाठा सातारा शहरही तापले आहेत.

नैऋत्य मोसमी पावसाची वाटचाल संथ
नैऋत्य मोसमी पावसाचे (मान्सून) अंदमानात आगमन झाल्याचे हवामान विभागाकडून जाहीर करण्यात आले. दक्षिण अंदमान समुद्र, दक्षिण बंगालचा उपसागर आणि निकोबार बेटांवर मान्सून दाखल झाला असून, पुढील तीन-चार दिवस मान्सूनला पुढे सरकण्यास अनुकूल वातावरण आहे. बंगालच्या उपसागराचा आणखी काही भाग आणि उत्तर अंदमान बेटांवर मान्सून पोहचेल अशी शक्‍यता होती. परंतू, गेल्या 24 तासात मान्सूनमध्ये प्रगती नाही. त्यामुळे अंदमानातच मान्सून रेंगाळणार का? असा प्रश्‍न उपस्थित झाला असून, तसे झाले तर मान्सूनचे केरळमधील आगमन लांबण्याची शक्‍यता आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)