मधुमेह, उच्च रक्तदाबावरील औषधांचा तुटवडा

  • मास्क आणि ब्रॅण्डेड कंपन्यांचे सॅनेटाइजरही मिळेना

पिंपरी – देशभरात केलेल्या लॉकडाऊनमुळे मधुमेह, उच्च रक्तदाब आणि हृदयविकारावरील औषधांचा दोन-दोन महिन्यांचा साठा करून ठेवण्याकडे रूग्णांचा कल वाढला आहे. पर्यायाने, संबंधित औषधांची मागणी वाढली आहे. तुलनेत पुरवठा कमी पडत असल्याने त्यांचा तुटवडा निर्माण झाला आहे. तसेच, मास्कमध्ये एन-95, टू प्लाय आणि थ्री प्लायमधील मास्कची देखील कमतरता जाणवत आहे. तसेच, ब्रॅण्डेड कंपन्यांचे सॅनेटाइजर सध्या बाजारपेठेत शोधूनसुद्धा सापडत नसल्याचे चित्र पाहण्यास मिळत आहे. त्याऐवजी, कधीही नाव न ऐकलेल्या अशा नवीन कंपन्यांचे सॅनेटाइजर मिळत आहेत.

मधुमेह, उच्च रक्तदाब आणि हृदयविकार असलेल्या रूग्णांना नियमित औषधे घ्यावी लागतात. 15 दिवसांची किंवा एक महिन्यांची औषधे ते घेतात. मात्र, लॉकडाऊन असल्याने ही औषधे न मिळाल्यास गैरसोय होईल, या भीतीपोटी संबंधित रूग्ण या औषधांचा दुप्पट साठा करून ठेवत आहेत. त्यासाठी त्यांच्याकडून करण्यात येणाऱ्या औषध खरेदीमुळे पुरवठ्याच्या तुलनेत मागणीचे प्रमाण जास्त असल्याने संबंधित औषधांचा सध्या तुटवडा जाणवू लागला आहे. करोनाच्या धास्तीने मास्कची मागणी वाढली आहे.

मास्कमध्ये सध्या एन-95, टू प्लाय आणि थ्री प्लायमधील मास्क मिळण्यात अडचणी येत आहेत. ब्रॅण्डेड कंपन्यांचे सॅनिटायझर सध्या बाजारात उपलब्ध होत नसल्याचे चित्र आहे. संबंधित मालाचा चांगलाच तुटवडा जाणवत आहे. तुलनेत कधीही नाव न ऐकलेल्या कंपन्यांनी सॅनेटाइजर बाजारपेठेत विक्रीसाठी आणले आहेत. अवाजवी किमतीला हे सॅनेटाइजर विकले जात आहेत.

शहरातील काही औषध विक्रेत्यांनी रूग्णांना घरपोच डिलिव्हरी देण्यास देखील सुरवात केली आहे. त्यामुळे रूग्णांना घरबसल्या औषधे मिळत आहेत. दरम्यान, औषधांची ने-आण करणारे काही डिलिव्हरी बॉय सुट्टीवर गेल्याने कमी मनुष्यबळावर औषध विक्रेत्यांना काम करावे लागत आहे.

सध्या बाजारपेठेत एन-95, टू प्लाय आणि थ्री प्लायमधील मास्कचा तुटवडा जाणवत आहे. तसेच, ब्रॅण्डेड कंपन्यांचे सॅनिटाइजर मिळत नसल्याची वस्तुस्थिती आहे. नवीन कंपन्यांचे सॅनिटाइजर विक्रीसाठी आले आहेत.
– विवेक तापकीर, उपाध्यक्ष, केमिस्ट असोसिएशन ऑफ पुणे डिस्ट्रिक्‍ट.

भिवंडी आणि फुरसुंगी येथे औषधे घेऊन येणाऱ्या गाड्या अडविल्या जात होत्या. याबाबत आयुक्तांना भेटून माहिती दिल्यानंतर संबंधित गाड्या पूर्ववत सोडण्यास सुरवात झाली आहे. त्यामुळे आता औषधे येत आहेत. मास्क आणि सॅनिटाइजरचा देखील पुरेसा साठा उपलब्ध आहे.
– संतोष खिंवसरा, अध्यक्ष, पिंपरी-चिंचवड केमिस्ट असोसिएशन

सध्या देशभरात सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे मधुमेह, उच्च रक्तदाब आणि हृदयविकारावरील औषधांचा दुप्पट साठा करून ठेवण्याकडे रूग्णांचा कल वाढला आहे. पर्यायाने, मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी पडत असल्याने संबंधित औषधांचा तुटवडा जाणवू लागला आहे.
– सचिन लोढा, औषध विक्रेते

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.