मतदानावर पावसाचे सावट

अनेक ठिकाणी निवडणूक कर्मचाऱ्यांची तारांबळ
दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला
मुंबई : विधानसभा निवडणुकीसाठी उद्या मतदान होणार आहे. पण या मतदानावर पावसाचे सावट आहे. कारण, पुढील 48 तासांत राज्यातील अनेक भागात मोठ्या पावसाचा अंदाज हवामान विभानाने वर्तवला आहे. पुणे, मुंबई, ठाणे, रायगडसह मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्‍यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. दरम्यान, उद्याच्या मतदानावर असलेले पावसाचे सावट आणि सलग दोन दिवस सुट्ट्या आल्याने मतदानाची टक्केवारी वाढणार कि कमी होणार, यावरून उमदेवारांच्या मनात धाकधूक वाढली आहे. विधानसभेबरोबरच सातारा लोकसभा मतदारसंघातही पोटनिवडणूक होत आहे.

14 वी विधानसभा अस्तित्वात येण्यासाठी उद्या, सोमवारी (21 ऑक्‍टोबर) राज्यातील 288 मतदारसंघात मतदान होत आहे. या निवडणूकीत दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली असून त्यांच्याबरोबरच नवख्या उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंदिस्त होणार आहे.

राज्यातील तब्बल 9 कोटी मतदार मतदानाचा हक्क बजावणार असून लोकशाहीच्या मतदान प्रक्रीयेसाठी निवडणूक आयोगाची यंत्रणा सज्ज झाली आहे. एकाच टप्प्यात होणाऱ्या या निवडणूकीत जनादेश कोणाला मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मतदान सुरळीतपणे पार पडावे म्हणून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

विधानसभेसाठी उद्या 288 मतदारसंघात मतदान होत आहे. त्यासाठी सुमारे 3 हजार 239 उमेदवार निवडणूकीच्या मैदानात उतरले आहेत. त्यांच्या राजकिय भवितव्याचा फैसला इलेक्‍ट्रॉनिक मतदान यंत्रात (ईव्हिएम) बंद करण्यासाठी सुमारे 8 कोटी 98 लाख 39 हजार 600 मतदार सज्ज झाले आहेत. यामध्ये पुरुष मतदार – 4 कोटी 68 लाख 75 हजार, 750 तर 4 कोटी 28 लाख 43 हजार 635 महिला मतदार आणि 2 हजार 634 तृतीयपंथी, 3 लाख 96 हजार 673 दिव्यांग आणि 1 लाख 17 हजार 581 सर्व्हिस मतदार आहेत.

राज्यावर असलेला कोट्यवधी रुपयांचा कर्जाचा डोंगर, कर्जमाफी, शेतकरी आत्महत्या, आरक्षण, मागासलेपणा, बेरोजगारी, बकाल शहरे या सतत चर्चेत असलेल्या समस्यांच्या पार्श्‍वभूमीवर मतदार आपल्या मताचे दान कोणाच्या पदरात टाकतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, राज्यात खास करुन मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी मेघगर्जनेनसह जोरदार पाऊस पडण्याचा अंदाजही व्यक्त करण्यात आला आहे. राज्यात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस पडेल अशीही शक्‍यता आहे. याशिवाय महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहण्याचीही शक्‍यता वर्तवण्यात आली आहे.

राज्यात 2762 मतदान केंद्रे संवेदनशील
विधानसभा निवडणूकीसाठी राज्यातील 2762 मतदान केंद्रे संवेदनशील म्हणून जाहिर करण्यात आली आहेत. ठाणे जिल्ह्यात सर्वाधिक 661 मतदान केंद्रे संवेदनशील असून त्या खालोखाल 325 केंद्रे मुंबई शहर जिल्ह्यात तर 252 मतदान केंद्रे पुणे जिल्ह्यात आहेत. अमरावती जिल्ह्यात 217, गोदिंयात 126, औरंगाबादमध्ये 100, सोलापूर 87, नाशिक 96, वाशिमला 85 तर बीड, लातूर आणि परभणी जिल्ह्यांत 50 ते 55च्या आसपास मतदान केंद्रे संवेदनशील म्हणून जाहिर करण्यात आली आहेत. या संवेदनशील ठिकाणच्या मतदान केंद्रावर सीसीटीव्हीचा वॉच राहणार आहे. विशेष म्हणजे नक्षलप्रभावीत गडचिरोलीसह वर्धा, बुलढाणा, अहमदनगर आणि मुंबई उपनगर जिल्ह्यात एकही मतदान केंद्र संवेदनशील म्हणून जाहिर करण्यात आलेले नाही.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.