रुस्तुम ए हिंद’ दादू चौगुले यांचे निधन

कोल्हापूर : देश-विदेशातील अनेक मल्लांची भिडत त्यांना लाल माती आणि मॅटवर आसमान दाखवणाऱ्या रुस्तुम ए हिंद आणि महान भारत केसरी पैलवान दादू चौगुले यांचे वयाच्या 73व्या वर्षी निधन झाले. कोल्हापुरातील डायमंड हॉस्पिटल येथे उपचार सुरू असताना त्यांची आज प्राणज्योत मालवली.

लाल माती सोबतच मॅटवरच्या कुस्तीत त्यांचा हातखंडा होता. न्यू मोतीबाग तालमीच्या माध्यमातून अनेक मल्लांना घडावण्याचे काम त्यांनी केले असून मैदानातील कुस्ती, कुस्तीचा प्रसार, संघटन प्रशिक्षण अशा क्षेत्रात त्यांनी प्रभावी कामगिरी पार पाडली आहे. त्यांच्या जाण्याने संपूर्ण कुस्ती क्षेत्रात शोककळा पसरली.

कोल्हापूरातील अर्जुनवाड या गावात पैलवान दादू चौगुले यांचा जन्म झाला. पण अनेक वर्षांपासून कोल्हापूर शहरात ते वास्तव्यास होते. दादू चौगले लाल मातीतून बाहेर पडल्यानंतरही त्यांची कुस्तीची नाळ कायम होती. अनेक मल्लांना त्यांनी तयार केले होते. कुस्तीच्या विकासासाठी झटणाऱ्या रुस्तुम ए हिंद, महान भारत केसरी, राष्ट्रकुल रौप्य पदक विजेते दादू चौगुले यांचा भारत सरकारने मानाच्या मेजर ध्यानचंद जीवन गौरव पुरस्काराने सन्मान केला होता. त्यांनी लाल मातीबरोबर मॅटवर ही राष्ट्रकुल स्पर्धेत भारताचा झेंडा फडकवला.

1973 साली न्यूझीलंडमध्ये झालेल्या 100 किलो गटातील कुस्ती स्पर्धेत रौप्यपदक पटकावले. त्याचबरोबर महान भारत केसरी रुस्तुम-ए-हिंद या मानाच्या गदासुद्धा कोल्हापुरात आणल्यामुळे त्यांच्या कुस्ती चांगलाच दरारा निर्माण झाला. आखाड्यातून बाहेर पडल्यानंतरही त्यांनी कुस्तीच्या प्रसारासाठी भरीव अशी कामगिरी करत योगदान दिले. राज्य व राष्ट्रीय पातळीवरील अनेक मल्ल त्यांनी घडवले. अखिल भारतीय कुस्तीगीर परिषदेची संबंध ठेवत कोल्हापुरातील मल्लांना त्यांनी राष्ट्रीय पातळीवर नेले. त्यांच्या निधनानंतर संपूर्ण कुस्ती क्षेत्रात शोककळा पसरली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.