भारताचे चीनला जशास तसे

सीमेवरील तैनात जवानांची संख्या वाढवत राहणार

नवी दिल्ली -सीमेवर आगळिकी करणाऱ्या चीनला जशास तसे उत्तर देण्याचा पवित्रा भारताने स्वीकारला आहे. त्यातून चीनने सैनिक वाढवल्यावर सीमेवर तैनात केल्या जाणाऱ्या आपल्या जवानांची संख्याही वाढवण्याचे धोरण भारताकडून अवलंबले जाणार आहे. त्याविषयीचे संकेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी मंगळवारी घेतलेल्या स्वतंत्र उच्चस्तरीय बैठकांमधून मिळाले.

करोना उद्रेकावरून जगभरातून फैलावर घेतले जात असल्याने चीनची अस्वस्थता वाढली आहे. त्यातून जगाचे लक्ष विचलित करण्याच्या उद्देशातून चीनकडून विविध क्‍लृप्त्या सुरू असल्याचे चित्र आहे. त्याचाच भाग म्हणून चीनने भारतालगत असणाऱ्या प्रत्यक्ष ताबा रेषेवर (एलएसी) आक्रमक स्वरूपाच्या हालचाली सुरू केल्या आहेत. त्यामुळे सीमेवर तणावाची स्थिती निर्माण झाली आहे.

त्यापार्श्‍वभूमीवर मोदींनी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, संरक्षण दल प्रमुख बिपीन रावत आणि तिन्ही दलांच्या प्रमुखांबरोबर महत्वाची बैठक घेतली. त्या बैठकीत सीमेवरील स्थितीचा आढावा घेण्यात आला. त्याआधी राजनाथ यांनीही तिन्ही दलांच्या प्रमुखांची बैठक घेतली. त्यामध्ये लष्करप्रमुख एम.एम.नरवणे यांनी सीमेवरील घडामोडींची आणि पूर्व लडाखमधील स्थितीची माहिती दिली.

राजनाथ यांनी सीमेलगत भारताकडून सुरू असलेले पायाभूत सुविधाविषयक प्रकल्प थांबवले जाणार नसल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे लडाख, सिक्कीम, उत्तराखंड आणि अरूणाचल प्रदेशातील प्रकल्प चीनच्या आक्षेपांमुळे भारत थांबवणार नसल्याचे अधोरेखित झाले. चीनच्या आगळिकींमुळे दोन्ही देशांच्या लष्करांमध्ये सुमारे 20 दिवसांपासून तणावाची स्थिती उद्भवली आहे.

मात्र, चीनला थेट संदेश पोहचवण्यासाठी भारतीय लष्करानेही सीमेवरील जवानांची संख्या वाढवली आहे. अर्थात, भारताच्या ठाम आणि कडक धोरणानंतरही चीनच्या कुरापती थांबणार नसल्याचे पुन्हा सूचित झाले. चीनने आता लडाखजवळ काही लढाऊ विमाने तैनात केल्याचेही स्पष्ट झाले आहे. त्यामुळे चीनकडून होणाऱ्या हालचालींच्या पार्श्‍वभूमीवर मोदी आणि राजनाथ यांनी घेतलेल्या बैठकांचे महत्व वाढले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.