बारामतीच्या मुळावर घाव घालणार – अमित शहा

बारामती – बारामतीच्या मुळावर घाव घालण्यासाठी आलो आहे. भाजपच्या उमेदवार कांचन कुल यांना विजयी करून नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान बनविण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी केले.

महायुतीच्या उमेदवार कांचन राहूल कुल यांच्या प्रचारार्थ बारामती येथे सभेचे आयोजन करण्यात आले होते. प्रचंड गर्दीत झालेल्या या सभेत अमित शहा बोलत होते. यावेळी त्यांनी शरद पवार आणि राहुल गांधी यांच्यावर सडकून टीका करीत अखंड बारामती शहराचेच नव्हे तर बारामती मतदार संघाचे लक्ष्य वेधले.

शहा म्हणाले की, घराणेशाहीचे राजकारण संपविण्याकरिता पंतप्रधान मोदी यांनी केले प्रयत्न केले आहेत. घराणेशाहीच्या राजकारणामुळेच देशाचा विकास खुंटला होता. त्यामुळेच मोदींने हे पाऊल उचलले. शरद पवार हे सत्तेत असताना त्यांनी महाराष्ट्राचा काय विकास केला, हे जाहीरपणे सांगावे. याचा हिशोब पवार यांनी जनतेसमोर मांडावा. महाराष्ट्र मागे ओढण्याचेच काम पवार यांनी केले आहे. पवार हे आजपर्यंत केलेला विकास जनतेसमोर मांडूच शकत नाही. असे सांगून शहा म्हणाले की, बारामती लोकसभा मतदार संघावर देशाचे लक्ष आहे. भाजपाने बारामतीत कमळ फुलविण्याचाच निर्धार केला आहे. सुरुवातीला मोदींची सभा बारामतीत होणार होती. मात्र, ती होणार नसल्याने माझी सभा म्हणजे नुरा कुस्ती असल्याची आवई उठवली जात आहे. मात्र, ही लढत नुरा कुस्तीची नसून कुल यांना लाखोच्या मताधिक्क्‌याने निवडून आणण्यासाठी मी बारामतीत आलो आहे, असे शहा यांनी ठणकावून सांगितले.

पवार यांना आपल्या राजकीय कारकिर्दीत स्वतःच्या तालुक्‍यातील पाणी प्रश्‍न सोडविता आलेला नाही. कॉंग्रेस पंडित नेहरूंपासून राहुल गांधी पर्यंत गरिबी हटावचा नारा देत आहे. परंतु, त्यांना सत्तर वर्षात देशाची गरिबी हटविता आलेली नाही, असे स्पष्ट करीत शहा यांनी कॉंग्रेसवरही टीका केली.

यावेळी चंद्रकांत पाटील, महादेव जानकर, राम शिंदे, बाळा भेगडे, विजय शिवतारे, माधुरी मिसाळ, राहुल कुल, कांचन कुल, वासुदेव काळे, दिलीप खैरे, बाबुराव पाचर्णे, शरद सोनवणे, बाळासाहेब गावडे, अविनाश मोटे, प्रशांत सातव, रंजना कुल, नितिन भामे, सुरेंद्र जेवरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.