पुणे – शिष्यवृत्ती परीक्षेची अंतिम उत्तरसूची प्रसिध्द

अंतरिम निकाल 25 एप्रिलपर्यंत जाहीर होणार

पुणे – महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने इयत्ता पाचवी व आठवीसाठी घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेची अंतिम उत्तरसूची प्रसिध्द करण्यात आली आहे. आता अंतरिम निकाल 25 एप्रिलपर्यंत जाहीर करण्यात येणार आहे.

राज्यात 24 फेब्रुवारीला शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात आली होती. यात इयत्ता पाचवीसाठी 5 लाख 12 हजार 667 तर इयत्ता आठवीसाठी 3 लाख 53 हजार 317 अशा एकूण 8 लाख 65 हजार 984 विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. राज्यातल्या विविध ठिकाणच्या एकूण 5 हजार 869 केंद्रांवर ही परीक्षा झाली. अंतरिम (तात्पुरती) मुदतीत प्राप्त झालेले आक्षेप व त्रूटींबाबत ऑनलाइन आलेली निवेदने यावर विषय तज्ज्ञांचे अभिप्राय विचारात घेऊन परीक्षा परिषदेने सुधारित उत्तरसूची तयार करून ती प्रसिध्द केली आहे. या उत्तरसुचीतील उत्तरे अंतिम समजण्यात आली आहेत. या अंतिम उत्तरसुचीबाबत आलेली निवेदने विचारात घेतली जाणार नाहीत, असे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांनी दिली आहे.

प्रश्‍नपत्रिकेच्या छपाईत चुका झाल्याने इयत्ता पाचवीचे 16 व इयत्ता आठवीचे 16 असे एकूण 32 प्रश्‍न रद्द करण्यात आले आहेत. एकूण 1 हजार 329 आक्षेप नोंदविण्यात आले होते. रद्द करण्यात आलेले प्रश्‍न वगळून उर्वरित एकूण गुणांमधून टक्‍केवारी काढण्यात येणार आहे. त्यानंतर गुणवत्ता यादी तयार करण्यात येणार आहे.

उत्तरपत्रिकांचे स्कॅनिंग पूर्ण झाले असून त्याची तपासणी करण्यात येणार आहे. ही तपासणी पूर्ण झाल्यानंतर अंतरिम निकाल जाहीर करण्याची प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.