पहिल्या टप्प्यात साडेसहा लाख बिले
पुणे – महापालिकेच्या मिळकतकर विभागाकडून 2019-20 या आर्थिक वर्षासाठीच्या मिळकत कर बिलांचे वाटप सुरू करण्यात आले आहे. यंदा हद्दीत समाविष्ट 11 गावांमधील मिळकतींसह 9 लाख 50 हजार मिळकतधारकांना बिलांचे वाटप केले जाणार आहे. त्यात पहिल्या टप्प्यात 6 लाख 50 हजार बिलांचा समावेश आहे.
दि.1 एप्रिल ते 31 मे या कालावधीत कर भरणाऱ्या नागरिकांना महापालिकेकडून सर्वसाधारण करात 5 ते 10 टक्के सवलत दिली जाते. त्यामुळे पहिल्या दोन महिन्यांत सुमारे सहा लाख मिळकतकधारक नियमितपणे कर भरून या सलवतीचा लाभ घेतात. अशा मिळकतधारकांना पालिकेकडून 27 मार्चपासून पोस्टाने मिळकतकराची बिले पाठविण्यास सुरूवात करण्यात आली आहे. ही बिले हातात पडताच नागरिकांना 1 एप्रिलपासून कर ऑनलाइन तसेच करभरणा केंद्रावर भरता येणार आहे. पहिल्या टप्प्यातीली बिले ही नियमित करदात्यांची असून त्यांच्यावर कोणतीही थकबाकी नाही. त्यामुळे त्यांना ही बिले पाठविण्यात आली असून दुसऱ्या टप्प्यात तीन लाख बिले एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात पाठविली जाणार आहेत.
11 गावांना पाहिल्यांदाच बिले
हद्दीत समाविष्ट 11 गावांना यंदा पहिल्यांदाच महापालिकेने मिळकतकर बिले पाठविली आहेत. मागील वर्षी ग्रामपंचायतीने दिलेल्या बिलांची वसुली करून संपूर्ण वर्षभरात या मिळकतींच्या बिलांच्या नोंदी प्रशासनाने पूर्ण केल्या आहेत. त्यानंतर मुख्यसभेने दिलेल्या मान्यतेनुसार, यंदापासून प्रत्येकी 20 टक्के बिले या गावांमधील मिळकतींना आकारली जाणार असून पाच वर्षांनंतर ही बिले 100 टक्के आकारली जाणार आहेत.