पालिकेच्या शिक्षण विभागाचा असाही “डिजिटल’ कारभार
अधिकारी म्हणतात, “ही बाब लक्षातच आली नाही’
पुणे – माहिती आणि तंत्रज्ञान शिक्षणाच्या नावाखाली कोट्यवधी रुपये खर्चून महापालिकेच्या शाळा ई-लर्निंग केल्या जात आहेत. तर, दुसऱ्या बाजूला या शाळांचा कारभार पाहणाऱ्या शिक्षण विभागाचे साधे संकेतस्थळही नाही. तसेच महापालिकेच्या संकेतस्थळावरही या विभागाची कोणतीही माहिती नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. त्यामुळे असा कसा “डिजिटल’ कारभार? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
पुणे महापालिकेच्या शिक्षण विभागाकडे तब्बल 287 शाळा असून लाखभर विद्यार्थी आहेत. तसेच दरवर्षी तब्बल 400 कोटी रुपयांचा खर्च या विभागावर केला जातो. त्यामुळे साधे संकेतस्थळ अथवा या विभागाची माहितीही संकेस्थळावर नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
न्यायालयाच्या आदेशानुसार, महापालिकेची शिक्षण मंडळे बरखास्त झाल्यानंतर मंडळाचा कारभार महापालिका आयुक्तांच्या नियंत्रणाखाली देण्यात आला आहे. त्यानंतर आयुक्तांनी या विभागाचे नाव बदलून “शिक्षण विभाग’ केले. तसेच त्याचे काम आता पालिकेच्या अखत्यारित चालते. मात्र, याला वर्ष होत आले तरी, या विभागाची दहा ओळींचीही माहिती महापालिकेच्या संकेतस्थळावर नाही. यापेक्षा धक्कादायक बाब म्हणजे, माहिती अधिकार अधिनियमाअंतर्गत पालिकेने सर्व विभागांची माहिती दरवर्षी संकेतस्थळावर “अपडेट’ करणे आवश्यक असताना या विभागाची साधी नोंदही पालिकेच्या संकेतस्थळावर नाही. त्यामुळे माहिती अधिकार अधिनियमालाही पालिकेकडून हरताळ फसला जात असल्याचे समोर आले आहे. दरम्यान, या बाबत प्रशासनानाकडे विचारणा केली असता, चक्क “ही बाब लक्षातच आली नाही,’ असे सांगण्यात आले. त्यामुळे ई- लर्निंगचे धडे विद्यार्थ्यांना देणाऱ्या शिक्षण विभागालाच “ऑनलाइन अपडेट’ होण्याची गरज असल्याचे समोर आले आहे.
मंडळ असताना होते संकेतस्थळ
महापालिकेच्या शिक्षण विभागाचे कामकाज ऑनलाइन नसले, तरी दुसऱ्या बाजूला जुने शिक्षण मंडळ असताना पालिकेचे संकेतस्थळ सुरू होते. त्यावर शाळा, संचालक मंडळ तसेच वेळोवेळी घेतल्या जाणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली नियमितपणे “अपडेट’ केली जात होती. मात्र, आता डीबीटी, मॉडेल स्कूल, ई-लर्निंग, क्रीडानिकेतन शाळा असे अनेक उपक्रम राबविले जात असतानाही त्याची साधी माहितीही नसल्याने डिजिटल पुण्याचा नारा देणाऱ्या महापालिकेचा कारभार या निमित्ताने पुन्हा एकदा समोर आला आहे.