पुणे – प्रवेशाच्या आमिषाने दोन विद्यार्थिनींची फसवणूक

पुणे – पिंपरी येथील डी.वाय.कॉलेज येथे औषधनिर्माण शास्त्र अभ्यासक्रमास प्रवेश मिळवून देण्याच्या आमिषाने इराणहून पुण्यात शिक्षणासाठी आलेल्या दोन विद्यार्थिनींची 9 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला. याबाबत सबाह बहाम नौबखत (वय 21, सध्या रा. उंड्री, मूळ रा. इराण) हिने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सबाह आणि तिची मैत्री पुण्यात शिक्षणासाठी आल्या आहेत. पिंपरीतील डी. वाय. कॉलेज ऑफ फार्मसीत त्यांना औषधनिर्माण शास्त्र अभ्यासक्रमास प्रवेश घ्यायचा होता. त्यावेळी एका परिचितामार्फत सबाहची आरोपीबरोबर ओळख झाली होती. वर्षभरापूर्वी आरोपीने सबाह आणि तिच्या मैत्रीणीला अभ्यासक्रमास प्रवेश मिळवून देण्याची बतावणी आरोपीने केली होती. त्यानंतर दोघींकडून प्रत्येकी साडेचार लाख रूपये घेतले. त्यानंतर प्रवेश मिळाल्याबाबतचे पत्र लवकरच देण्यात येईल, असे सांगून गेले वर्षभर आरोपीने त्यांना उडवाउडवीची उत्तरे दिली.

फसवणूक झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर सबाहने नुकतीच पोलिसांकडे तक्रार दिली. या प्रकरणाचा पोलीस उपनिरीक्षक व्ही. एच. पाडवी तपास करत आहेत.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here