पुणे – उड्डाणपूल, की जोडप्यांचे अड्डे?

पोलिसांचेही नाही लक्ष : पदपथावरून चालणेही लाजीरवाणे


जाब विचारणाऱ्या पोलिसांवरही अरेरावी

पुणे – रस्त्यांवरील अतिक्रमणे, नो पार्किंगमधील गाड्या, बेवारस, बिनधनी गाड्या या सगळ्यांवर हिरिरीने पोलिसांकडून कारवाई केली जाते, परंतु शहरातील पुलांवर बसून अश्‍लील चाळे करणाऱ्या जोडप्यांवर कोणतीच कारवाई केली जात नसल्याचे दिसून आले आहे.

एखादी गाडी नो पार्किंग मध्ये किंवा आखून दिलेल्या लाईनच्या जराही बाहेर आली असली तरी वाहतूक पोलीसांकडून लगेचच कारवाई केली जाते. जॅमर लावून ती गाडी सील केली जाते आणि हजार पेक्षा जास्त रुपयांची पावतीही फाडली जाते. त्यामुळे वाहनचालकाला मनस्ताप सहन करावा लागतो. अशावेळी तासनतास पुलावर गाडी लावून त्याचाच आडोसा करून अश्‍लील चाळे करणाऱ्या या प्रेमीयुगुलांवर मात्र कोणतीच कारवाई होत नाही.

झेड ब्रीज, एस. एम. जोशी पूल, विठ्ठल रामजी शिंदे (बालगंधर्व) पूल, नदीपात्राजवळील कठडा, ओंकारेश्‍वराची मागील नदीपात्राची बाजू या पुलांवर सर्रास हा प्रकार पहायला मिळतो. संध्याकाळचे पाच-साडेपाच झाले की या पुलावर हे जोडपे अक्षरश: जागा पकडायला आल्याप्रमाणे येतात. गाड्या लावतात आणि तासनतास येथे बसतात. ज्यांना बसायला जागा मिळत नाही ते अंधाराचा फायदा घेऊन तेथे उभे राहतात.

त्यांचे चाललेले अश्‍लील प्रकार पाहून पुलाच्या पदपथावरून चालणेही अतिशय कठीण होऊन जाते. एखादी व्यक्ती शेजारी चालत गेली तरी त्यांना त्याचे भान नसते. जे भान ठेवतात ते तात्पुरते स्वत:ला सावरून बसतात, परंतु पादचारी पुढे गेला की पुन्हा त्यांचे अश्‍लील प्रकार सुरू होतात. परिचितांना चेहरे ओळखू येऊ नयेत म्हणून मुली अक्षरश: चेहरा ओढणीने झाकून घेतात.

पोलिसांनी येथे गाड्या लावण्यावरून कारवाई केली, परंतु सार्वजनिक ठिकाणी अश्‍लील चाळे करण्याचा गुन्हा दाखल केला नाही. त्यामुळेच असा प्रकार करणाऱ्यांचे फावते. दंड भरून गाड्या सोडवून घेतल्या जातात. काही वेळातर पोलिसांशीच अरेरावीच्या भाषेत वाद घातले जातात. “गाडीचा दंड देतोय ना, तो घ्या’ अशा शब्दांत पोलिसांनाच सुनावले जाते.

ज्येष्ठ नागरिक म्हणतात…
“नदीपात्रातील कठड्यावर बसणाऱ्यांचा तर अक्षरश: शनिवारवाड्यावरच सत्कार करायला हवा,’ असा टोला एका ज्येष्ठ नागरिकाने मारला. संध्याकाळ झाली तर या भागात डासांचे भयंकर साम्राज्य असते, अशा स्थितीतही अगदी रात्री 11-12 वाजेपर्यंत येथे जोडपे बसलेले असतात. डासांच्या हल्ल्यात नदीकाठावरील घरांमध्येही बसणे मुश्‍कील होते. अशावेळी हे लोक प्रेमाच्या आणाभाका देत नदीकाठावर बसतात, याबद्दल त्यांचा सत्कार का करू नये असा सवाल या ज्येष्ठ नागरिकाने विचारला आहे.

पोलीसांचे दामिनी पथक करते काय?
महिला, मुलींची, महाविद्यालयीन विद्यार्थीनींची छेडछाड होत असेल तर तक्रार केल्यानंतर त्याठिकाणी दामिनी पथक येते. परंतु अशा ठिकाणी नेमकी कोणावर कारवाई करावी असा प्रश्‍न या दामिनी पथकातील महिला पोलीस कर्मचाऱ्यांना पडतो. वाहने अडथळा ठरतील अशा ठिकाणी लावली म्हणून कारवाई करावी की, अश्‍लील चाळे सुरू आहेत म्हणून कारवाई करावी, असाही प्रश्‍न त्यांना पडतो. “याबाबत वाहतूक विभागानेही कारवाई करणे अपेक्षित आहे. या जोडप्यांबाबत तक्रार केल्यानंतर संबंधित पोलीस ठाण्याकडूनही कारवाई होणे आवश्‍यक आहे.प्रत्येक पोलीस ठाण्यात दोन महिला कर्मचाऱ्यांचे एक असे दामिनी पथक नेमण्यात आले आहे,’ अशी माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त भानुप्रताप बर्गे यांनी दिली.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.