पुणे – उघड्या गटारीमुळे नागरी आरोग्य धोक्‍यात !

दीड वर्षानंतरही आरोग्य समस्या जैसेथेच

कात्रज – पुणे पालिकेतील नागरिकांप्रमाणे जीवनमान उंचावेल या अपेक्षेने ग्रामपंचायत निवडणुकीवर बहिष्कार घालणाऱ्या आंबेगाव खुर्द शनिनगरवासीयांच्या नशिबी उपेक्षाच आल्याचे दिसत आहे. येथील समस्यांनी नागरिक त्रास झाले असून प्रशासनाला जाग कधी येणार असा सवाल उपस्थित करत आहेत.

पुणे शहराचा विस्तार होऊन नोव्हेंबर 2017 साली समावेश झालेल्या गावांपैकी आंबेगाव खुर्दचा समावेश आहे. गावातील शनिनगर हा झोपडपट्टी परिसर आहे. या भागात उघड्या गटारीतून मैलायुक्त व सांडपाणी वाहत आहे. त्यामुळे डास, माशा यांचा प्रादुर्भाव वाढला आहे. साथीच्या रोगांनी लहान मुले, महिला आजारी पडतात. नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.

समाविष्ट गावातील पाणी पुरवठा व ड्रेनेज लाईनची कामे मनपा मुख्य खात्याकडून केली जातात तर स्वच्छता, कचरा व्यवस्थापन देखभाल व दुरुस्तीची कामे धनकवडी सहकारनगर क्षेत्रीय कार्यालयाच्या वतीने करण्याचे ठरविण्यात आले आहे.मात्र मनपा मुख्य विभाग व क्षेत्रीय कार्यालय प्रशासन या गंभीर समस्यांबाबत उदासीन दिसत आहेत. त्यामुळे पालिकेतील नागरिकांप्रमाणे उत्तम सुविधा मिळण्याचे स्वप्न स्वप्नच राहील का असा प्रश्न नागरिक विचारात आहे.

नव्याने समाविष्ट भागाला लोकप्रतिनिधी नसल्यामुळे सर्व मदार मनपा अधिकाऱ्यांवर आहे. त्यामुळे संबंधित अधिकारी वर्गाने याकडे लक्ष द्यावे. जी तत्परता कर वसुलीबाबत दाखवली तीच तत्परता नागरी सुविधेबाबत दाखवावी अशी माफक अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.