पुणेकरांना आता खुणावतोय गावरान आंब्याचा गोडवा

तुरळक आवक सुरू : चवीला गोड आणि रसदार फळांना मागणी

पुणे – खवय्ये आतुरतेने वाट पाहणाऱ्या गावरान आंब्याची तुरळक आवक सुरू झाली आहे. नैसर्गिकरित्या पिकविलेल्या मधुर, रसदार आणि आकाराने मोठे असलेल्या आंब्याला दर्जानुसार बाजरात डझनास 20 ते 200 रुपये भाव मिळत आहे. भोर, वेल्हा, मुळशी तालुक्‍यातून गावरान हापूसची आवक होत असते. पुढील आठवड्यापासून आवक वाढेल, असा अंदाज व्यापाऱ्यांनी वर्तविला आहे.

सध्या मुळशी तालुक्‍यातील बेलावडे, उरावडे आदी भागांतून आंबा बाजारात दाखल होत आहे. दररोज 10 ते 12 डाग आवक होत असून, एका डागामध्ये 10 ते 12 डझन माल असतो. आंब्याचे गावरान पायरी, गावरान हापूस, रायवळ, गोटी असे प्रमुख चार प्रकार आहेत. रत्नागिरी हापूस आंब्याचा हंगाम संपत आल्यानंतर या गावरान आंब्याची आवक सुरू होत असते. हापूसच्या प्रतिडझनास 200 रुपये, पायरी 100 तर रायवळच्या प्रतिडझनाला 20 ते 40 रुपये भाव मिळाल्याचे व्यापारी यशवंत ऊर्फ तात्या कोंडे यांनी सांगितले.

ते म्हणाले, यंदाच्या वर्षी प्रतिकूल हवामानामुळे रत्नागिरी हापूस तसेच कर्नाटक हापूसच्या लागवडीवर परिणाम झाला. उन्हाच्या कडाक्‍यामुळे गावरान हापूसच्या लागवडीवर परिणाम झाला असून गावरान हापूसचे उत्पादन यंदा 60 टक्‍क्‍यांनी कमी झाले आहे. येत्या रविवारपासून गावरान हापूसची आवक वाढेल. परराज्यांतील आंबा हा रंगाने चांगला असतो. त्यामुळे ग्राहक त्याच्याकडे वळतात. पण चवीला आपला गावरान आंबाच अधिक गोड असतो. या आंब्याचा रंग गडद पिवळा नसतो. याचा रस करता येतो. साधारण जून महिनाअखेरपर्यंत या आंब्याच हंगाम राहिल.

यावर्षी कर्नाटक, मद्रास भागांतील हापूस आंब्याबरोबरच इतर आंब्यांची आवकही चांगली होत आहे. त्यांचा हंगाम सुरू असल्याने गावरान आंब्यालाही त्यांच्याबरोबर स्पर्धा करावी लागत असल्याचेही कोंडे यांनी सांगितले.

मुळशीतून होतेय आवक
मुळशी भागातील शेतकऱ्यांनी आंब्याची झाडे जपली आहेत. प्रत्येक शेतकरी चार ते पाच पाट्या माल बाजारात आणतो. सध्या आवक कमी होत आहे. पाड लागल्यानंतर शेतकरी आंबा तोडण्यास सुरवात करतात. सध्या मुळशी तालुक्‍यात आंबा तोडण्याचे काम सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.