कुरकुंभ पोलीसांची कारवाई; 22 लाखांचा भेसळयुक्त मुद्देमाल जप्त
कुरकुंभ – रस्त्यासाठी वापरल्या जाणाऱ्या डांबरामध्ये पावडर टाकून भेसळ करणाऱ्या प्लॅन्टवर धाड टाकून पोलीसांनी कारवाई केली आहे. यामध्ये दोन टॅंकरसह 21 लाख 93 हजार 600 रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी उमेश बीरबल मोरया (वय 45, रा. दत्तमंदिर आण्णाभाऊ साठे नगर टेलीफोन लाईन जवळ वाकड पुणे), राजु सिताराम पांडे (वय 36, रा. घाटेगाव, ता. मोहना, जि. ग्वॉल्हेर, सध्या रा. कुरकुंभ, ता. दौंड) यांना अटक केली आहे. याबाबत तेजस मधुकर मोहिते यांनी फिर्याद दिली आहे. पांढरेवाडी (ता.दौंड) येथील जमीन गट नंबर 485 या मोकळ्या जागेत राजरोसपणे डांबर भेसळीचा प्रकार सुरू होता.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, टॅंकरमधून डांबर काढून त्यात पावडर भेसळ केली जात असल्याची माहिती पोलीसांना मिळाली. त्यानुसार आज (दि.11) छापा टाकण्यात आला. याठिकाणी डांबर वाहतूकीचे टॅंकर (क्र. एमएच 04 सीआर 8341) आणि टॅंकर (क्र. एमएच 18 ऐऐ 9982) तसेच इलेक्ट्रीक मोटर (जनरेटर) असलेला टेम्पो (क्र. एमएच 12 क्यु 6665) उभा होता. या टॅंकरमधील तळात राहिलेले डांबर काढून ते मिक्सरमध्ये घेऊन त्यात पांढऱ्या रंगाची पावडर मिक्स (भेसळ) करून भेसळयुक्त डांबर पुन्हा टॅंकरमध्ये भरून पाठविली जात असल्याचा प्रकार येथे सुरू होता. पोलिस निरीक्षक सुनील महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस उपनिरीक्षक तेजस मोहिते, हवालदार के. बी. शिंदे, राकेश फाळके, सचिन बोराडे, अमोल राऊत, दत्तात्रय चांदणे यांनी सदर ठिकाणी छापा टाकून कारवाई केली.