देशद्रोह्यांना मदत करणाऱ्यांचे डिपॉझिट जप्त करा – देवेंद्र फडणवीस

शिक्रापूर – राष्ट्रवादी व कॉंग्रेसचे नेते म्हणजे देशद्रोह्यांना मदत करणारे नेते असून ते सांगतात की, आमची सत्ता आल्यावर आम्ही कलम 124-अ काढून टाकू म्हणजेच देशद्रोह्यांना मदत करणारे हे नेते आहेत, म्हणून देशद्रोह्यांना मदत करणाऱ्यांचे डिपॉझिट जप्त करा, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

शिक्रापूर येथे शिवसेना, भाजपा, रिपाइं, रासप, शिवसंग्राम व रयत क्रांती महायुतीचे उमेदवार खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारसभेच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्यात बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. याप्रसंगी खासदार आढळराव, आमदार बाबूराव पाचर्णे, महेश लांडगे, योगेश टिळेकर, शरद सोनवणे, निरंजन डावखरे यांसह महायुतीचे पदाधिकारी आदी मान्यवर, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, पहिल्या दोन टप्प्यांतील मतदान झाले असून त्यामध्ये विरोधकांचा सुपडा साफ झालाय. त्यामध्ये बारामती व माढा हलून गेला आहे, असे सांगत शरद पवार समोरून मोदी दिसताच मैदानातून निघून गेले. विरोधकांची भाषणे म्हणजे मनोरंजन असून राष्ट्रवादी व कॉंग्रेसचा जाहीरनामा देशद्रोही आहे. आमच्या सरकारने या देशाची मान उंचाविण्याचे काम केले असल्याचे सांगत सरकारने सर्वसामान्य लोकांसाठी तसेच शेतकऱ्यांसाठी आणलेल्या वेगवेगळ्या योजनांचा पाढा जनतेला सांगितला भ्रष्टाचार संपविण्याचे काम नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली चालले असल्यामुळे जनतेचे पैसे थेट त्यांच्या खात्यात जातो. आज पाच वर्षांत 98टक्के घरात शौचालय झाले. उज्वलासारख्या योजनेतून तेरा कोटी घरात गॅस आला. 2022पर्यंत या देशात एकही व्यक्ती बेघर राहणार नाही या हेतूने महाराष्ट्रात दहा लाख घरे गावांमध्ये तर पाच लाख घरे शहरात बांधण्याचे काम सुरु आहे.

सध्या विरोधक हे या भागातील विमानतळ हे आढळराव यांच्यामुळे गेले असे सांगत आहेत; परंतु विमानतळ जाण्यामागील मुख्य कारण म्हणजे या भागातील नद्या, टेकड्या तोडाव्या लागत होत्या शेतकऱ्यांची सुपीक जमीन त्यामध्ये जात होती असे अहवाल आल्यानंतर हे विमानतळ पुरंदरला गेलेले असून आपला नाकर्तेपणा हे विरोधक आढळराव पाटील यांच्या माथी मारत आहेत. सध्या बैलगाडा शर्यतीचा मुद्दा सुप्रीम कोर्टात असून बैलगाडा शर्यतबंदी ही विरोधकांच्या काळात झालेली असून त्यावेळी विरोधक गप्प का होते? विरोधक आता पाकिस्तानच्या सर्जिकल स्ट्राईकचा पुरावा मागत आहे; परंतु आम्हाला तुम्ही पुरावा मागणार हे आधी माहित असते तर केलेल्या सर्जिकल कारवाईत रॉकेटबरोबर तुमचा एखादा नेता पाठविला असता. अशी कोपरखळी मुख्यमंत्र्यांनी मारली. देशाच्या सुरक्षिततेच्या हेतूने ही निवडणूक असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.