देहूगावात बेपत्ता मुलाचा शोध

तीन दिवसांपूर्वी येलवाडी येथून झाला होता गायब

महाळुंगे इंगळे  –
खेळायला जातो, असे सांगून घरातून निघून गेलेल्या दहा वर्षांच्या, चौथीत शिकणाऱ्या चिमुरड्याचा तब्बल तीन दिवसांनी देहू हद्दीत एका धनगराच्या वाड्यावर शोध लागला आहे. पोलिसांच्या सहकार्याने त्याला त्याच्या आई-वडिलांच्या ताब्यात देण्यात आल्याने त्याच्या नातेवाइकांनी पोलिसांना धन्यवाद दिले आहेत. येलवाडी (ता. खेड) गावाच्या हद्दीतून सबंधित चिमुरडा गायब झाला होता.

कृष्णा संभाजी तेलंगे (वय 10, सध्या रा. येलवाडी, ता. खेड, मूळ रा. गोदामगाव, पो. कोलंबी, ता. नायगाव, जि. नांदेड) हा चौथीत शिकणारा मुलगा येलवाडी (ता. खेड) येथून 19 एप्रिलला सकाळी साडेअकराच्या दरम्यान खेळायला जातो, असे सांगून अचानक गायब झाला होता. याप्रकरणी त्याचे वडील संभाजी शंकर तेलंगे (वय 32, रा. येलवाडी, ता. खेड ) यांनी चाकण पोलीस ठाण्यात मुलगा बेपत्ता झाल्याची फिर्याद दिली होती, तेव्हापासून त्याचा सर्वत्र शोध घेण्याचे काम सुरू होते.

बेपत्ता झाल्यानंतर कृष्णा दिवसभर फिरून फिरून दमल्याने रात्री तो देहू येथील एका मंदिरात झोपला. त्यानंतर अखेर तिसऱ्या दिवशी सोमवारी (दि. 22) सायंकाळी चारच्या दरम्यान तो देहू हद्दीतील इंद्रायणी नदीलगत एका धनगरांच्या तांड्यावर असल्याची कुणकुण त्याच्या नातेवाइकांना लागली. त्याठिकाणी प्रत्यक्ष जाऊन खात्री केली असता कृष्णा त्या ठिकाणी सापडला. पोलिसांच्या मदतीने त्याला त्याच्या नातेवाइकांकडे सुपूर्त करण्यात आल्याचे पोलीस हवालदार सुभाष पवार यांनी सांगितले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.