“त्या’ बांधकाम व्यावसायिकांना पोलीस कोठडी

कोंढव्यातील सोसायटीची सीमाभिंत कोसळल्याचे प्रकरण

पुणे – कोंढवा भागातील ऍल्कॉन स्टायलस सोसायटीची सीमाभिंत बांधकाम मजुरांच्या वसाहतीवर (लेबर कॅम्प) कोसळून 15 जणांचा मृत्यू झाल्याच्या दुर्घटनेस जबाबदार असल्या प्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून अटक करण्यात आलेल्या दोघा बांधकाम व्यावसायिकांना 2 जूनपर्यंत (मंगळवार) पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे.

विवेक सुनील अगरवाल (वय 32) आणि विपुल सुनील अगरवाल (वय 30 दोघे रा. क्‍लोव्हर हिल्स, एनआयबीएम रस्ता, कोंढवा) अशी कोठडी झालेल्या बांधकाम व्यावसायिकांची नावे आहेत. या प्रकरणी ऍल्कॉन लॅंडमार्क्‌सचे भागीदार जगदीशप्रसाद तिलकचंद अगरवाल (वय 64), सचिन अगरवाल (वय 34), राजेश अगरवाल (वय 27), विवेक सुनील अगरवाल (वय 21), विपुल सुनील अगरवाल (वय 21) तसेच कांचन हाऊसिंग बांधकाम कंपनीचे भागीदार पंकज व्होरा, सुरेश शहा, रश्‍मीकांत शहा, अभियंता, बांधकाम पर्यवेक्षक, बांधकाम मजूर पुरविणारा ठेकेदार यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक सागर काळे यांनी याबाबत फिर्याद दिली आहे.

अगरवाल यांना रविवारी न्यायालयात हजर करण्यात आले. या दुर्घटनेत 15 जण मृत्यूमुखी पडले असून गुन्ह्याचे स्वरूप गंभीर आहे. संबंधित सोसायटीची सीमाभिंत 2013 मध्ये बांधण्यात आली आहे. ही भिंत मोडकळीस आली होती. याबाबत वेळोवेळी सोसायटीतील रहिवाशांनी अगरवाल यांच्याकडे तक्रार केली होती. मात्र, त्यांनी सोसायटीतील रहिवाशांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष केले होते. ऍल्कॉन स्टायलस सोसायटीच्या इमारतीचे बांधकाम नकाशे, कागदपत्रे मिळावायची आहेत. सीमाभिंतीच्या बांधकामाचा ठेका कोणाला दिला होता, यादृष्टीने तपास करायचा आहे. आरोपी जगदीशप्रसाद अगरवाल, त्यांचा मुलगा राजेश, सचिन यांच्या बाबत पोलिसांनी विचारणा केली. तेव्हा अटकेत असलेल्या आरोपींनी पोलिसांना माहिती देण्यास टाळाटाळ केली. सीमाभिंतीच्या बांधकामासाठी परवानी घेतली होती का, तसेच या प्रकरणात अन्य आरोपींचा सहभाग असल्याने तपास करण्यासाठी अटकेत असलेल्या आरोपींनी पोलीस कोठडी देण्यात यावी, अशी विनंती पोलिसांनी न्यायालयात केली.

Leave A Reply

Your email address will not be published.