तळेगाव दाभाडे (वार्ताहर) -गुटखा आणि पान मसाला साठवणूक व विक्री करणाऱ्या दुकानदाराला तळेगाव दाभाडे पोलीस व अन्न व औषध प्रशासन (पुणे) यांच्या संयुक्त कारवाईत अटक करण्यात आली. त्याच्याकडून 14 हजार 994 रुपयांच्या मुद्देमाल जप्त करण्यात आला. कारवाईनंतर पोलिसांनी दुकान सील केले आहे. सोमाटणे फाटा येथील हिंदुस्थान सुपर मार्केट दुकानात शुक्रवारी (दि. 30) ही कारवाई झाली. आरोपीला वडगाव मावळ न्यायालयाने बुधवारपर्यंत (दि. 4) पोलीस कोठडी दिली.
नैनाराम वनाजी चौधरी (वय 42, रा. भीमनगर, कामशेत, ता. मावळ) असे दुकानदार आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमाटणे हद्दीतील हिंदुस्थान सुपर मार्केटमध्ये आरोपी नैनाराम चौधरी याने गुटखा साठवणूक ठेवत त्याची विक्री करत होता.
अशी माहिती अन्न व औषध प्रशासन विभाग अन्न सुरक्षा अधिकारी गणपत कोकणे यांना मिळाली. त्यानुसार तळेगाव पोलीस आणि अन्न व औषध प्रशासन विभागाचे अधिकारी यांनी घटनास्थळी धाव घेतली. दुकानाची तपासणी केली असता पांढऱ्या पोत्यात 14 हजार 994 रुपयांचा गुटखा मिळून आला. पोलीस व अन्न औषध प्रशासन विभाग यांनी हिंदुस्थान सुपर मार्केट सील करून मुद्देमाल जप्त केला.