आयुक्‍तालयाच्या ताफ्यात आणखी पाच गाड्यांची भर

सीएसआर फंडाद्वारे महिंद्रा कंपनीनेही दिली वाहने 

पिंपरी – वोक्‍सवॅगन पाठोपाठ आता महिंद्रा कंपनीनेही पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्‍तालयाला पाच वाहने सीएसआर फंडाच्या माध्यमातून दिली आहेत. यामुळे एका आठवड्याच्या आत पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयास दहा नवीन चारचाकी वाहने मिळाली आहेत. याचा पोलिसांना निवडणूक काळात चांगला उपयोग होणार आहे.

महिंद्रा कंपनीतर्फे सीएसआर फंडातून बुधवारी (दि.10) पाच बोलेरो जीप आयुक्‍तालयाला देण्यात आल्या आहेत. आयुक्‍तालयाच्या आवारात घेण्यात आलेल्या कार्यक्रमात महिंद्रा कंपनीचे अधिकारी विजय कलरा यांच्या हस्ते पोलीस आयुक्‍त पद्मनाभन यांना वाहने देण्यात आली. यावेळी अतिरिक्‍त आयुक्‍त मकरंद रानडे, महिंद्रा कंपनीचे अधिकारी यांच्यसह पोलीस अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

पोलीस महासंचालकांनी सीएसआरद्वारे गाड्या घेण्याची परवानगी पिंपरी-चिंचवड आयुक्‍तालयाला दिल्यानंतर सीएसआर फंडातून वाहने मिळवण्याचा मार्ग मोकळा झाला. अपुरे मनुष्यबळ आणि त्याहून तटपुंजी वाहने असल्याने पोलिसांवर मोठा ताण येत आहे. परंतु कंपन्यांकडून सीएसआर फंडाद्वारे वाहने दिली जात असल्याने पोलिसांना काही अंशी दिलासा मिळाला आहे. पोलीस आयुक्‍तांनी चाकणमधील कंपन्यांना मदतीसाठी आवाहन तसेच पाठपुरावा केला होता. त्यानुसार एका आठवड्यापूर्वी वोक्‍सवॅगन कंपनीने पाच वाहने दिली. त्यानंतर बुधवारी महिंद्रा कंपनीने पाच बोलेरो जीप आयुक्‍तालयाला दिल्या. तसेच आगामी काळात निवडणुकीच्यापूर्वी आणखी काही मोटार तसेच दुचाक्‍या आयुक्‍तालयात दाखल होण्याची शक्‍यता आहे. यावेळी पोलीस आयुक्‍त आर. के. पद्मनाभन यांनी कंपनीचे आभार मानले. वोक्‍सवॅगन कंपनीनेही आठ दिवसांपूर्वी सीएसआर फंडातून पाच गाड्या आयुक्‍तालयाला दिल्या आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.