आयत्या पिठावर राष्ट्रवादीच्या रेघोट्या

नारायणगाव – शिवसेना उपनेते आणि माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रयत्नांतून ऑक्‍टोबर 2018मध्ये मंजुरी मिळालेल्या आणि फेब्रुवारी 2019मध्ये टेंडर प्रक्रिया पूर्ण झालेल्या, तसेच 10 मार्च 2019 रोजी भूमिपूजन झालेल्या कामाचे खोटे श्रेय लाटण्यासाठी दुसऱ्यांदा भूमिपूजन करणे म्हणजे राष्ट्रवादीचा “आयत्या पिठावर रेघोट्या मारण्या’चा प्रकार असल्याचा टोला शिवसेना जुन्नर तालुकाप्रमुख माऊली खंडागळे यांनी लगवला.

खेड-सिन्नर महामार्गावरील खेड घाट व नारायणगाव बाह्यवळण कामाचे दुसऱ्यांदा भूमिपूजन केल्याबद्दल शिवसेना जुन्नर तालुकाप्रमुख माऊली खंडागळे यांनी पत्रकार परिषद घेऊन राष्ट्रवादीच्या खोटेपणाचा कागदोपत्री पुराव्यानिशी भांडाफोड केला.

माऊली खंडागळे म्हणाले की, या महामार्गावरील पाच बाह्यवळणांची कामे पूर्ण करण्यात ठेकेदाराला अपयश आले होते, त्यामुळे वाहतूककोंडी कमी व्हावी म्हणून आढळरावांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली आणि काही पर्याय सुचविले. ही कामे डी-स्कोप करून पाच बाह्यवळणांची नव्याने निविदा काढावी व नवीन ठेकेदार देऊन ही कामे पूर्ण करावी, अशी मागणी गडकरी यांनी मान्य केली होती. त्यानुसार या पाच बाह्यवळणांची सुमारे 450 ते 500 कोटींची कामे एकत्र निविदा राबवून सुरू केल्यास कामाला विलंब होईल हे गडकरी यांच्या निदर्शनास आणून देत या कामांपैकी मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी होणाऱ्या खेड घाट व नारायणगाव बाह्यवळणांची कामे अल्प मुदतीत स्वतंत्र निविदा राबवून केल्यास ही कामे लवकर पूर्ण होऊन, प्रवाशांना दिलासा मिळेल अशी आग्रही मागणी गडकरी यांना करून त्याचा पाठपुरावा केला होता. तर 23 नोव्हेंबरला या 9.5 कि. मी. लांबीच्या कामाची निविदा प्रसिद्ध करण्यात आली. या निविदा प्रक्रियेला 7 जानेवारी 2019 पर्यंत मुदत देण्यात आली होती.

निविदा प्रक्रियेनुसार हे काम रोड-वे सोल्युशन या कंपनीला मिळाले. 8 मार्चला 72 कोटी 88 लाख रुपयांचे इकरार पत्रदेखील राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून ठेकेदार कंपनीला देण्यात आले. त्यानंतर दोन दिवसांनी या कामाचे तत्कालीन खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, जुन्नरचे आमदार शरद सोनवणे, खेडचे आमदार सुरेश गोरे यांच्या हस्ते भूमिपूजन झाले होते. केवळ ठेकेदार व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्यातील आपापसातील अंतिम करार, ठेकेदाराकडून घेण्याची बॅंक गॅरंटी व आचारसंहिता लागू झाल्याने हे काम सुरू करण्यास ठेकेदाराला तीन-चार महीने कालावधी लागला.

… अन्यथा जनतेची माफी मागा
केवळ विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन खोट्या कामाचे श्रेय लाटण्याचे व लोकांच्या डोळ्यात धूळफेक करण्याचे उद्योग राष्ट्रवादीच्या नेत्यांनी बंद करावेत. या कामाला मंजुरी मिळवण्यात राष्ट्रवादी चा काडीमात्रही संबंध नाही. त्यामुळे जुन्नर तालुका राष्ट्रवादीने या कामासाठी त्यांनी केलेला पाठपुरावा व मिळालेल्या मंजुरीचे पुरावे सादर करावेत अन्यथा जनतेची जाहीर माफी मागावी, असे जाहीर आव्हान तालुकाप्रमुख माऊली खंडागळे यांनी दिले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)