अखेरच्या दिवसांवर अमावस्येचे सावट

बुधवारीच दाखल होणार सर्व उमेदवारांचे अर्ज?


उमेदवारांवर मतदारांपेक्षा तिथी, ज्योतिषाचा जास्त प्रभाव

पुणे – निवडणुकीत हार-जीत ही मतदारांनी आपला कौल कोणाला दिला यावर ठरत असली तरी मतदारांपेक्षाही उमेदवारांवर तिथी आणि ज्योतिषावर असलेला प्रभाव आजच्या विज्ञान युगातही कायम असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. पुणे आणि लोकसभा निवडणुकीचे अर्ज भरण्याची मुदत 4 एप्रिल (गुरुवार)पर्यंत असली तरी, त्या दिवशी अमावस्या असल्याने सर्व प्रमुख पक्षांच्या उमेदवारांचे अर्ज बुधवारीच दाखल होणार आहेत. भाजप-सेना युतीच्या उमेदवारांचा अर्ज मंगळवारी दाखल झाला आहे; तर कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडीच्या उमेदवारांचे अर्ज बुधवारी दाखल होणार आहेत. त्यामुळे एका बाजुला विज्ञानाच्या जोरावर अंतराळातील उपग्रहांवर हल्ला करण्याची क्षमता देशाने कमाविली असली तरी, याबाबतचा निर्णय देशाच्या लोकसभेत बसून घेणाऱ्या लोकप्रतिनिधींच्या मनावर आजही तिथी आणि ज्योतिषाचे गारूड असल्याचे या निमित्ताने पुन्हा एकदा समोर आले आहे.

लोकसभा निवडणुकीत प्रचाराला जाताना मतदार राजाकडे उमेदवार आपल्या मतांची बेगमी मागत असला तरी, निवडणुकीत कोणतेही बालंट अथवा संकट नको म्हणून उमेदवारी अर्ज भरण्याच्या तारखेपासून प्रचाराचा मुहूर्त निश्‍चित करण्यापर्यंत उमेदवार ज्योतीषांची मदत घेतात. त्यात मग उमेदवारी याद्या जाहीर करण्यापासून अर्ज भरण्यापर्यंत तिथी आणि मुहूर्त पाहिले जातात. पुणे आणि बारामती लोकसभा मतदारसंघातही अशीच काहीशी स्थिती आहे. एरवी अनेक पक्षांच्या उमेदवारांकडून अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी आपला अर्ज सादर केला जातो. मात्र, या दोन्ही मतदारसंघासाठी 4 एप्रिल हा अंतिम दिवस असून त्या दिवशी दुपारी 12 पासूनच अमावस्या आहे. त्यामुळे यावेळी शेवटच्या दिवसाची वाट न पाहाता भाजप उमेदवाराचा 2 एप्रिलला अर्ज भरण्यात आला आहे; तर कॉंग्रेसकडून सोमवारी रात्रीपर्यंत उमेदवार निश्‍चित न झाल्याने आघाडीतील राष्ट्रवादी कॉंग्रेसने बारामती लोकसभा मतदारसंघासाठीचा अर्ज भरण्याचा 3 एप्रिलचा दिवस निश्‍चित केला होता. मात्र, कॉंग्रेसकडून मंगळवारी रात्री उशिरा पुण्यासाठीचा उमेदवार जाहीर केल्याने आता हे दोन्ही पक्ष बुधवारी अर्ज सादर करणार आहेत. तर इतर उमेदवारही अमावस्या लक्षात घेता अर्ज उद्याच भरणार असल्याची शक्‍यता व्यक्त केली जात आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.