राज्यातील एफआरपी देणाऱ्यांत कोल्हे कारखान्याचा समावेश
बिपिन कोल्हे ः कारखान्याच्या गळीत हंगामाची सांगता
कोपरगाव – सहकार महर्षी शंकरराव कोल्हे साखर कारखान्याने 154 दिवसांच्या गळीत हंगामात 6 लाख 60 हजार टन उसाचे गाळप केले असून, प्रतिदिन सरासरी 4 हजार 315 टन उसाचे उंच्चाकी गाळप केल्याची माहिती अध्यक्ष बिपिन कोल्हे यांनी दिली.
कारखान्याच्या 56 व्या गळीत हंगाम सांगता कार्यक्रमात ते बोलत होते. दरम्यान संचालक मनेष गाडे व सीमा गाडे यांच्या हस्ते सत्यनारायण पूजा करून हंगामाची सांगता करण्यात आली. व्यासपीठावर माजी मंत्री व कारखान्याचे संस्थापक शंकरराव कोल्हे, आमदार स्नेहलता कोल्हे, उपाध्यक्ष संजय होन आदी उपस्थित होते. कोल्हे म्हणाले, कारखाना स्थापन झाल्यापासून प्रथमच उसाच्या गाळपात इतक्या मोठ्या प्रमाणात उच्चांकी नोंद कारखान्याने केली आहे. तसेच 1 कोटी 93 लाख युनिट इतकी वीजनिर्मिती कारखान्याच्या माध्यमातून केली. हेही कारखान्याच्या इतिहासातील पहिलीच घटना आहे. यामध्ये सर्व सभासद, कामगार, अधिकारी व संचालक मंडळाची मेहनत आहे.
चालू हंगामात राज्यातील 195 कारखान्यांनी गळीत सुरू केले. या कारखान्यांची मागच्या वर्षी तयार असलेली साखर तशीच पडून आहे. तसेच मागील वर्षीचा अधिकच्या उसामुळे साखर उद्योगाला दुहेरी संकटाला सामोरे जावे लागत असल्याचे त्यांनी सांगितले. केवळ 15 ते 20 कारखान्यांनी एफआरपी प्रमाणे उसाला दर दिला. त्यामध्ये कोल्हे कारखान्याचा समावेश आहे. शासनाच्या नियमाप्रमाणे इथेनॉल निर्मिती प्रकल्पाचे काम सुरू आहे. कारखान्याच्या माध्यमातून कालवे दुरुस्ती सुरू असल्याचे कोल्हे म्हणाले. आमदार कोल्हे म्हणाल्या, शासनस्तरावर शेतकऱ्यांच्या हितासाठी माझे काम सुरू आहे. कमीत कमी पाण्यावर उसाचे उत्पादन घ्यावे. पाण्याचा प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न मी करीत आहे. निळवंडेचे कालवे होणारच असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी सर्व संचालक, अधिकारी, सभासद शेतकरी व कर्मचारी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.