विविधा – तू माझी माउली… 

अश्‍विनी महामुनी 

माझी माउली, देवा तू माझी साउली 
पाहतो वाटुली, पांडुरंगे..पांडुरंगे…

स्वरराज छोटा गंधर्व यांच्या आवाजातील संत तुकारामांचा हा अभंग कधीही ऐकला की मन नुसते भरून येते. माउली या शब्दातच काही जादू आहे. ती जगत्जननी तर साऱ्या विश्‍वाची माउली. भारतीय पद्धतीनुसार आईच्या महतीसाठी आपण मातृदिन साजरा करतो, तो श्रावणी अमावस्येला. पण इंग्रजी पद्धतीप्रमाणे आपण तो साजरा करू लागलो आहोत मे महिन्याच्या दुसऱ्या रविवारी.मे महिन्याच्या दुसऱ्या रविवारी मदर्स डे साजरा करण्याची प्रथा काही आजकालची नाही. ही प्रथा पडून शंभर वर्षे होऊन गेली आहेत.

अमेरिकेचे 28 वे राष्ट्राध्यक्ष थॉमस विल्सन यांनी 8 मे 1914 रोजी मे महिन्यातील दुसरा रविवार मातृदिन म्हणून घोषित करून सुटी जाहीर केली. ही सुट्टी आपल्या आईसोबत साजरी करावी,या हेतूने अमेरिकेपुरती ही घोषणा होती. पण त्यानंतर जगभर हा दिवस साजरा करण्यास सुरुवात झाली.

अमेरिकेमध्ये मदर्स डे ची व्याप्ती फक्त स्वत:च्या जन्मदात्या आईपुरतीच मर्यादित नाही, तर आजी , मावशी , सावत्र आई, मदर इन लॉ अर्थात सासू , आईप्रमाणे सांभाळ करणारी स्त्री किंवा मुलाला दत्तक घेतले आहे अशी स्त्री, सरोगेट मदर म्हणजे मातेसमान असणाऱ्या सर्वासाठी मातॄदिन आहे.

मातृदिन साजरा केला काय वा केला नाही काय, आई ती आईच रहाणार. मातृदिन साजरा केल्याने वा न केल्याने तिचे प्रेम कमी होणारच नाहीये. पण साजरा केला तर तिला आनंदच मिळेल. कोणताही दिन साजरा करणे हे काही चुकीचे नाही त्याचे अवडंबर माजवणे योग्य नाही, इतकेच!

मातृदिन साजरा करण्याचा उद्देश चांगलाच आहे. आई-वडिलांना त्याची आवश्‍यकता नसली तरीही ते साजरे करावेत. मुलांच्या मनातील भाव त्यांना शब्दाविना, कृतीविनाही जाणवत असतातच. ते नातेच तसे निस्सीम आहे’ पण तरीही कौतुकाचे चार शब्द त्यानाही हवेच असतात. भावना नुसत्या मनात ठेवून काय उपयोग? त्या योग्य वेळी योग्य प्रकारे व्यक्तही व्हायला हव्या जेवताना एखाद्या पदार्थाचे कौतुक करणे, जेवल्यावर किंवा इतर वेळी आईला घरकामात मदत करणे, तिचे श्रम कसे कमी होतील हे पाहणे, आपल्या आनंदात तिला सहभागी करून घेणे, तिच्या जवळ बसून संवाद साधणे अशा अनेक गोष्टीतून तो व्यक्त होत असतोच. प्राचीन काळी गुरुकडील अध्ययन पूर्ण झाल्यानंतर शिष्याला निरोप देताना आचार्य उपदेश करीत असत. त्यात “मातृदेवो भव।’ मातेची देवाप्रमाणे पूजा कर असे सांगत असत. वसिष्ठ ऋषींनी मातेचे श्रेष्ठ पुढीलप्रमाणे सांगितले आहे

“दहा उपाध्यायांपेक्षा एक आचार्य श्रेष्ठ आहे. शंभर आचार्यांपेक्षा एक पिता श्रेष्ठ आहे आणि एक सहस्र पित्यांपेक्षा एक माता ही अधिक श्रेष्ठ आहे.”

नास्ति मातृसमा छाया नास्ति मातृसमा गति:
नास्ति मातृसमं त्राणं नास्ति मातृसमा प्रियों 

मातेसारखी छाया नाही, मातेसारखे आश्रयस्थान नाही, मातेसारखे रक्षण नाही आणि मातेइतकं प्रिय कुणीही नाही.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)