आरोग्याचे चार नियम

चार या क्रमांकाचे महत्त्व फार मोठे आहे. चार वेद, चार आश्रम, चार वर्ण, चार दिशा…. अशा किती तरी गोष्टी चारशी संबंधित आहेत. अशाच चार गोष्टींचा आणखी एक चौकडा आपल्याला माहीत करून घ्यायचा आहे. नुसता माहीत करून घ्यायचा नाही. वाचून विसरून जायचा नाही, तर तो लक्षात ठेवून अमलात आणायचा. हा चौकडा लाखमोलाचा आहे, कारण तो आपल्या आरोग्याशी संबंधित आहे. या चार गोष्टी कोणत्या, ते पुढे जाणून घेऊ.
आपलं आरोग्य चांगलं राहावं असं प्रत्येकाला वाटतं. आरोग्यम धनसंपदा म्हणतात ते उगीच नाही, आता ही आरोग्य उत्तम राखणं हे इतर कोणाच्या नाही तर ते बऱ्याच अंशी आपल्याच हाती आहे. आता सर्वप्रथम उत्तम आरोग्य कशाला म्हणायचे याची योग्य कल्पना आपल्याला असली पाहिजे. उत्तम आरोग्य म्हणजे दुसरेतिसरे काही नाही, तर उत्तम आरोग्य म्हणजे शारीरिक व मानसिक निरोगीपणा. अगदी सोपी व्याख्या आहे ही.

आपण चांगले धडधाकट असावं, आपलं आरोग्य चांगलं राहावं, प्रकृती कशी खणखणीत असावी, असं प्रत्येकाला वाटतं आणि खरं सांगायचं तर उत्तम आरोग्य राखणं हे बऱ्याच अंशी आपल्याच हाती आहे. शारीरिक व मानसिक निरोगीपणा म्हणजे उत्तम आरोग्य. हे दोन्ही प्रकारातील आरोग्य एकमेकांवर अवलंबून आहे. उत्तम आरोग्य राखण्यासाठी चतुःसूत्री प्रत्येकाने जाणून घेतली पाहिजे.

या चतुःसूत्रीत समावेश होतो सुनिश्‍चित दिनचर्या, उत्तम आहार, व्यायाम आणि मानसिक संतुलनाचा.
आता आपण आपले उत्तम आरोग्याचे चार नियम पाहू-

1) लवकर निजे लवकर जागे, त्यासी उत्तम आरोग्य लाभे, असे आपल्या पूर्वजांनी सांगून ठेवलेलेच आहे, यातील सुनिश्‍चित दिनचर्या हा उत्तम आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. (आणि त्याकडेच आपले दुर्लक्ष होत असते.) प्रत्येकाची दिनचर्या सकाळी लवकर सुरू झाली तर आरोग्य उत्तम राहील. यानंतरचा महत्त्वाचा घटक आहे उत्तम आहार. आहार सर्वसमावेशक असावा. यात सर्व प्रकारच्या भाज्या-पालेभाज्यांचा समावेश असावा. फळांचा अंतर्भाव असावा. दूध, अंडी, सर्व प्रकारच्या डाळीदेखील आहारात सामील करणे गरजेचे आहे. आवश्‍यकतेनुसार तेल आणि तुपाचा वापर करावा. त्याने शरीरातील अनावश्‍यक घटक वाढत नाहीत. अगदी साध्यासाध्या सवयीसुद्धा आरोग्य उत्तम राखण्यासाठी उपयोगी ठरतात. आता हात धुण्याचीच सवय बघा. नियमितपणे जेवणापूर्वी व जेवणानंतर हात धुण्याच्या सवयीमुळे डायरिया, डिसेंट्री यासारखे आजार दूर राहतात.

आहार हवा उतरत्या क्रमात
बरेचदा लोकांना एकाच वेळी भरपूर जेवण्याची सवय असते. ही सवय अत्यंत चुकीची आहे. त्याऐवजी दिवसातून चार वेळा खाल्ले पाहिजे. आपला हा आहार उतरत्या क्रमात असला पाहिजे. म्हणजे सकाळची न्याहारी बऱ्यापैकी असावी. त्यानंतर जेवणाचे प्रमाण थोडे थोडे कमी करावे. रात्री कमी जेवावे. प्रत्येक जेवणाच्या वेळी सकस आहार जाईल, याकडे कटाक्ष असावे. आहारात अत्यंत तेलकट, तुपकट पदार्थांचा समावेश टाळावा. असे केल्याने हृदयविकार, मधुमेह, रक्तदाबासारखे आजार दूर राहतात.

व्यायाम गरजेचा
धकाधकीच्या युगात व्यायामाकडे आपण दुर्लक्ष करीत आहोत; परंतु अनेक आजारांना दूर ठेवण्याची शक्ती व्यायामात आहे. नियमितपणे वेगाने चालणे, धावणे, योगीक व्यायाम, प्राणायाम, ध्यान, चिंतन या गोष्टी अनेक आजारांना दूर पळवितात. मानसिक संतुलन कायम राखण्यासाठी सर्वांत महत्त्वाचे आहे समाधान. लोभ आणि अहंकार यापासून दूर राहिल्याने मानसिक समाधान प्राप्त होते. त्यातून उत्तम मानसिक संतुलन मिळते. व्यक्तीशः मानसिक संतुलनातून उत्तम सामाजिक आरोग्यही मिळते. सामाजिक दातृत्व भावनेतूनही उत्तम मानसिक आरोग्य प्राप्त होते. योग, प्राणायाम आणि चिंतनातून ही अवस्था सहज प्राप्त होते. त्यामुळे सकाळी दिनचर्या सुरू करताना योग आणि प्राणायाम यापासून सुरू करावा.

नियमित तपासणी करावी
भरपूर पाणी प्यावे. त्याने शरीरातील पाण्याचे संतुलन कायम राहते. शरीरातील मीठ आणि साखरेचे प्रमाणही कायम राखणे गरजेचे आहे. उत्तम आरोग्यासाठी ही चतुःसूत्री पाळत असताना नियमित तपासणीकडे दुर्लक्ष करू नये. डॉक्‍टरांच्या सल्ल्यानुसार व वयानुरूप काही तपासण्या करणे क्रमप्राप्त ठरते. त्यामुळे त्यांच्याकडेही दुर्लक्ष करू नये. अशा तपासण्यांच्या माध्यमातून वेळीच रक्तदाब, मधुमेह, हाडांचे विकार आदी आजारांना आळा घालता येतो किंबहुना त्यांच्यावर वेळीच नियंत्रण ठेवता येते. एकंदरीत आरोग्य उत्तम असेल तर आयुष्यात सामोऱ्या येणाऱ्या वेगवेगळ्या परिस्थितीशी दोन हात करण्याची शारीरिक व मानसिक क्षमता तुमच्यात निर्माण होईल.

योगिता जगदाळे

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×